एका जिद्दी ची सफर
मातीकामगार ते विद्यावाचस्पती(पी.एच.डी) :-
एक संघर्षमय जीवनप्रवास
अवतीभवतीच्या पाच-पन्नास वाड्यावस्त्यांचा मिळून ‘पिलीव’ या ठिकाणी दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो. या गावापासून चार-पाच कि.मी. दूरवर असलेल्या पिलीवाच्या घाटामध्ये सुळेवाडी हे चिमुकले गाव आहे.
“माझं गाव सुळेवाडी आहे माणदेशी तिरी
सीमा सातारी संपून सुरू होते सोलापुरी”
अशा दुष्काळग्रस्त गावात जन्माची खरी तारीख माहीत नसलेला मी अंदाजित ०१ जून १९८२ मध्ये जन्मलो. सतत दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मी इयत्ता पाचवीत शिकत असताना वडिलांचे गंभीर आजारपणामुळे नोव्हेंबर १९९४ साली निधन झाले. कोणत्याही नातेवाईकांचा आधार नसल्यामुळे व कमालीचे दारिद्र्य असल्यामुळे आईने नोव्हेंबर १९९४ यावर्षी एका शेतकऱ्याच्या घरी दहा-बारा वर्षाचा असताना जनावरे राखण्यासाठी चाकरी ठेवले. श्री गोविंदा बगाडे गुरुजी, श्री विठ्ठल जनवर गुरुजी यांसारखे प्राथमिक शाळेतील शिक्षक मिळाल्यामुळे व त्यांनी संभाळून घेतल्यामुळे कसंतरी पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. दरवर्षी नऊमाही परीक्षेच्या काळात माझ्यासह गावातील सर्व मुलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा सोडून पालक चिंचणी मायाक्का देवीला घेऊन जात होते. तरीसुद्धा या सर्व शिक्षकांनी आम्हाला परीक्षेच्या संधी देऊन मायेचा आधार दिला. श्री विठ्ठल जनवर गुरुजी हे माझ्या वडिलांचेही शिक्षक होते. बालपणी आईचे छत्र हरवल्यामुळे माझ्या वडिलांना सावत्र भावांनी मेंढरावरती चाकरी ठेवलेले होतं. त्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे व लहानपणापासून दारूचे व्यसन लागल्यामुळे त्यांना मानसिक आजार जडलेला होता. पाचवीला पुजलेले दारिद्र्य जीवन जगत असताना आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आम्हाला उपाशी पोटी झोपावे लागत होते. मी पाचवीला असताना वडिलांनी केलेलं कर्ज फेडण्यासाठी आई मुकादमची उचल घेऊन वसईला मातीकाम करण्यासाठी मला एकट्याला गावी सोडून वसई येथे आली. बहिणीचा सातवीत असताना बालविवाह झालेला होता.
कमरेइतक्या मातीच्या भिंती असलेल्या बिनदरवाज्याच्या आणि वरून गवताचे छप्पर असणाऱ्या घरात आई मला एकट्याला सोडून पोट भरण्यासाठी वसईला गेली.
दुसऱ्याच्या शेतात मजुरीने आणि रोजगार हमीवरती कामे करून हातानेच चुलीवर स्वयंपाक करून खात होतो. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. त्यावेळेस श्री बाळू बगाडे हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामना करून शिक्षक झालेले होते. त्यांना परिस्थितीची जाणीव असल्यामुळे या शिक्षकाने तळमळीने मदत व संस्कार करून पुढील शिक्षणाची माझ्यामध्ये गोडी निर्माण केली. इयत्ता आठवीला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हे हायस्कूल पिलीव या बाजारपेठेच्या गावामध्ये घाट्याच्या मातीच्या भिंती असलेल्या वाड्यात भरत होते.
आठवीमध्ये दोन-तीन महिने झाल्यानंतर एका शेतकऱ्याच्या शेतात काम करीत असताना चुलीसाठी लाकडं गोळा करीत होतो. ऐन दुपारच्या वेळेस लाकूड पाय ठेवून मोडत असताना लाकडाचे ढलपी पायात घुसून तळव्यातून वरती आली त्यामुळे पायाला अपंगत्व आले. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे अनवाणी पायाने काठीचा आधार घेऊन सुळेवाडी ते पिलीव हे अंतर पायी चालत जात होतो. तसेच सुट्टीच्या दिवशी सुजलेला पाय घेऊन कापूस वेचणी, ज्वारी काढणे, खुरपणी आणि रात्रभर गव्हाची कापणी करणे अशी कामे करीत गावी पोट भरीत होतो. बारावीला या महाविद्यालयामध्ये ७० टक्के गुणांनी कला शाखेतून उत्तीर्ण झालो. डी.एडला फक्त एक मार्क कमी पडत असल्याने राज्यस्तरीय निवड समितीने प्रवेश दिला नाही. पैसे नसल्यामुळे खाजगी महाविद्यालयात जाऊ शकलो नाही. गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसवडच्या भैयासाहेब राजमाने वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्ष कला या वर्गात प्रवेश घेतला. परंतु दोनच महिन्यात पैशाअभावी कॉलेज सोडून द्यावे लागले. एकीकडे मोडलेल्या पायाच्या असहाय्य वेदना सहन करीत एक लंगडी शेळी, एक लंगडी कोंबडी आणि एक लंगडी गायी या तिघांसोबत त्यांना संभाळणारा एक लंगडा मालक म्हणून आम्ही चौघेजण पोट भरीत होतो. रात्रभर गाईच्या आधाराने आणि दिवसभर शेळीच्या दुधाने जगत होतो. सकाळी लवकर उठून चुलीवरचा स्वयंपाक बनवून कोणाच्यातरी शेतामध्ये पिकांना पाणी देण्याचे काम करीत होतो. कोणाची तरी मेंढरं दिवसभर मजुरीने राखून आठवडाभराचा खर्च काढत होतो. या प्रत्येक संकटासमयी मला देवदूत म्हणून अनेक शिक्षक आधारस्तंभ म्हणून उभा राहिले. या शिक्षकांनी मला मानसिक, भावनिक आणि प्रसंगी आर्थिक आधार दिला. श्रीमती देशमुख मॅडम यांनी माझी इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची फी भरली. बारावीनंतर मात्र महाविद्यालय सोडून दिले. ऐन पावसाळ्याच्या दिवसात वसईला आलो. त्यापूर्वीच उन्हाळ्यामध्ये आईच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू वाढल्यामुळे तिने काम करीत असताना विषारी साप हातात धरला होता. दैव बलवत्तर म्हणून ती वाचली होती. त्यामुळे तिचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नव्हता. नव्या जोमाने वसई नगरीत येऊन मिळेल ते काम करीत राहिलो. दिवाळीनंतर गावाकडून येणाऱ्या मुकादमकडून उचल घेऊन आईचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले. तिला गावी ठेवलं आणि मी वसईला राहू लागलो. पहाटेच्या तीन वाजता उठून सात-आठ किलोमीटर अंतरावर डोक्यावर पानाची पाटी, केळीचा नुंगर घेऊन अनवाणी पायांनी होळी या ठिकाणी भरणाऱ्या बाजारात जायचो. त्या ठिकाणी विविध भागातून टेम्पोतून आलेल्या भाजीपाल्याच्या गोणी वाहून पैसे मिळवायचो. स्वतःचा उदरनिर्वाह करता करता आईला औषधपाणी व खर्चासाठी पैसे देत होतो. पावसाळ्यात मुकादम गावी गेले की नाक्यावरती नाकाकामगार म्हणून उभे राहायचो. शरीरयष्टी नाजूक असल्यामुळे नाक्यावरती लोक कामाला सहसा बोलवत नव्हती. माझी मात्र चिमणी पाखरं सिनेमातील लंगड्या मुलासारखी अवस्था होऊन गेलेली होती. जर कोणी मिळाले नाही तर मला बिगारी म्हणून कामावर घेऊन जात होते. स्लॅब भरणे, इमारतीचे खड्डे खोदणे, विहिरी खोदणे, बावखलाचा गाळ काढणे, सहा-सात मजल्यापर्यंत सिमेंटच्या गोणी, विटा, रेती डोक्यावर वाहून चढविणे. नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचे गटार साफ करणे. शौचालय साफ करणे. भात कापणी करणे अशी अनेक कामे करीत वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय व अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय येथे कला शाखेतून प्रथम श्रेणी मिळवून पदवी घेतली. या काळात स्वर्गीय प्रा.डॉ. सिद्धार्थ तांबे, प्रा. डॉ.शत्र्घुन फड यांसारखे ग्रामीण भागातून आलेल्या आणि परिस्थितीची जाणीव असलेल्या शिक्षकांनी मला मदत केली. त्यामुळे अर्थशास्त्र व मराठी विषयातून वर्तक महाविद्यालयातून २००४ साली पदवी घेतली. या काळात मला आत्मिक ऊर्जा देणारी आणि मनोबल वाढविणारी झोंबी, तीन दगडाची चूल, आठवणीचे पक्षी, गबाळ, बिऱ्हाड, उपरा, उचल्या, पालातील माणसं, अक्करमाशी, तराळ अंतराळ, कोल्हाट्याचं पोरं अशी कितीतरी आपले अनुभव कथन केलेली आत्मचरित्र वाचनास मिळाली. त्यामुळे आत्मविश्वास बळावत गेला. मातीकाम करीत असताना मुंबई विद्यापीठात स्वर्गीय प्रा. अरुण कांबळे सर, भाषावैज्ञानिक डॉ. अलका मटकर, डॉ. वसंत पाटणकर, डॉ. हरिश्चंद्र थोरात, डॉ. पुष्पलता राजापुरे तापस यांच्यासारख्या शिक्षकांनी आयुष्याला कलाटणी दिली. मराठी भाषा विषयाचे उत्कृष्ट, व्यासंगी आणि तज्ज्ञ अध्यापक मिळाल्यामुळे एम. ए मराठीचे शिक्षण २००७ साली व्दितीय श्रैणी मिळवून पूर्ण केले. सन २००१ मध्ये फक्त एका गुणांनी राज्यस्तरीय डी.एड. निवड समितीच्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेलो होतो. ती खंत मनात सतावत होती. पदवीनंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षेची बी.एड प्रवेश प्रक्रियेसाठी असणारी परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्येसुद्धा फक्त एका गुणामुळे बी.एड साठी निवड झाली नाही. मी खूप निराश झालो. वाळून गेलेल्या गवताला जशी पालवी फुटावी तसा प्रसंग माझ्या आयुष्यात आला. काही मुलांनी विनाअनुदानित महाविद्यालयातील प्रवेश सोडून दिल्यानंतर मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात दोन जागांसाठी स्पॉट ऍडमिशन प्रक्रिया राबविण्यात आली. त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मला बी.एड महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या भा. आ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालयात विनाअनुदानीत विभागात प्रवेश मिळाला. या वेळेला अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील फड सरांनी आपल्या प्राध्यापक मित्र आणि दानशूर व्यक्ती यांच्याकडे प्रत्यक्षात जाऊन मदत मागितली. मला तीस हजार रुपये जमा करून सावर्डे या ठिकाणी प्रवेश मिळवून दिला. उर्वरित फी मला शिष्यवृत्तीतून भरता आली. सावर्डे या ठिकाणी सप्टेंबरमध्ये प्रवेश झाला. खूप मेहनतीने अभ्यास केला. खानावळीत भांडी घासली. मित्रांच्या मदतीने शिरूरकर या ग्रंथपालांना गच्चीवर असलेल्या खोलीत राहायला गेलो. त्या ठिकाणी असलेल्या वीस पंचवीस मित्रांनी माझ्या हिस्साचे भाडे भरले. सर्व मित्रांनी पैसे काढून मला वार्षिक सहलीसाठी घेऊन गेले. विश्वास काटकर, मनोज भोईर, जगदीश तेटगुरे, राकेश मानके, अरुण परगे यासारख्या महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या मित्रांनी आपल्या घरातून मदत मागून मला दिली. त्यामुळे उशिरा प्रवेश होऊनसुद्धा बी.एड महाविद्यालयात प्रथम श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून पास झालो. बी.एड करून आल्यानंतर कोणताही आधार आणि ओळख नसल्यामुळे पुन्हा वर्षभर मातीकाम आणि ग्रामपंचायतीचे गटारे साफ करीत जीवन जगत होतो. अनेक शाळांना भेट देऊन नोकरी देण्यासाठी विनंती करीत होतो. परंतु माणदेशासारख्या भागातून आल्यामुळे आणि बोलीभाषेचा प्रभाव असल्यामुळे कोणतीही शाळा थारा देत नव्हती. अशातच अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे १९७६ साली माजी प्राचार्य आणि कोमसापचे अध्यक्ष प्रा.पु.द. कोडोलीकर सर यांनी शिफारस केल्यामुळे विरारमधील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय या खाजगी शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून २००७ साली रुजू झालो. या काळात पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठातून मराठी विषयातून एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालो. अर्धा दिवस शाळा, एम.ए.चा अभ्यास आणि हमाली व मातीकाम याची जोड देऊन काम करीत होतो. आईच्या दुसऱ्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्यामुळे ती व्यवस्थित होती. अशातच आयुष्यात परिस्थितीतून उभे राहात असताना खूप मोठा मानसिक अपघात झाला. आई आणि मी पुन्हा अंगावरील कपड्यावरती आलो. आईने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मी आयुष्यात तीन वेळा मरणाच्या दाढेतून बाहेर आलो. आत्महत्येच्या वळणावरती येऊनसुद्धा भीक मागून शिकविणाऱ्या विधवा आईसाठी निर्णय बदलून पुन्हा या गंभीर संकटातून संघर्ष करीत उभा राहिलो. अशा सर्व घडामोडी आणि प्रसंगावर मात करीत असताना उत्कर्ष माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना राऊत या माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आधारस्तंभ ठरल्या. त्यांनी मला आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रसंगी स्वतःच्या पगारातून आर्थिक मदत केली. उत्कर्ष माध्यमिक विद्यालयातील स्पर्धा परीक्षेची जबाबदारी देऊन एक आयुष्याला वळण देणारी संधी दिली. राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय शिष्यवृत्ती परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांना शिकविण्याची संधी दिली. त्यामुळे स्वतःचा बौद्धिक, भावनिक आणि मानसिक विकास होत गेला. त्या खंबीरपणे आयुष्यात पाठीमागे उभ्या राहिल्यामुळे त्यांनी मला वि.वा. ठाकूर चारिटेबल ट्रस्टच्या कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा विषयाच्या अध्यापनाची संधी दिली. अत्यंत गरीब घरातील, निराधार, अनाथ मुलांशी या स्पर्धा परीक्षांमुळे संपर्क वाढला. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या केलेल्या मार्गदर्शनामुळे बहुसंख्य विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवड होऊ लागली.
कनिष्ठ महाविद्यालयात व माध्यमिक शाळेत शिकवित असताना इतर अनेक पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करू लागलो. सन २०१४ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम.एड. प्रथम श्रेणीतून पूर्ण केले. सन २०१६ रोजी पुणे व मुंबई विद्यापीठात पी.एच.डी साठी असणारी पेट ही पूर्व परीक्षा पास झालो. ऑक्टोंबर २०१६ रोजी डॉ.अलका मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठात ‘माणदेशी मेंढपाळ धनगर जमातीच्या लोकसहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या संशोधन विषयाची नोंदणी केली. सुट्टीच्या काळात संपूर्ण माणदेश आणि शंभूमहादेव डोंगररांगेच्या कुशीतील मेंढपाळांच्या वाड्यावस्त्या पिंजून काढल्या. काळ्यारानात, वायदेशात आणि माणदेशी मेंढपाळ धनगर वास्तव्यास असलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन लोकसाहित्याची माहिती संकलित केली. या काळामध्ये पुन्हा एकदा माणनदीच्या जलप्रणालीच्या परिसरात आढळणाऱ्या माणदेशी धनगर आणि इतर जमातीच्या जवळून अभ्यास करता आला. अनेक सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली. दरम्यानच्या काळात राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण प्रशासकीय प्रबोधिनीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले. जिल्हा सातत्यपूर्ण व्यवसाय विकास संस्था यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना विविध विषयावरील प्रशिक्षण देता आली. कोणत्याही प्रकारची कौटुंबिक, शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमी नसताना माणदेश ते वसई हा प्रवास केवळ कष्टामुळे सुखकर झाला. डॉ.अलका मटकर यांच्यासारख्या तज्ज्ञमार्गदर्शकाच्या मार्गदर्शनामुळे सन २०२२ या वर्षी मला मुंबई विद्यापीठातून ‘माणदेशी मेंढपाळ धनगर जमातीच्या लोकसाहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर विद्यावाचस्पती (पी.एच.डी)ची पदवी मिळाली. सतत मेहनत, जिद्द आणि संकटाशी सामना करण्याची तयारी ठेवल्यास आयुष्यात उत्तम यश संपादन करता येते. भविष्यात टिकावं-फावडं हे आत्मचरित्र आणि वेदनेच्या शब्दकळा हा कवितासंग्रह लवकरात लवकर लिहून पूर्ण करण्याचा मानस आहे. हा लेख लिहून महाराष्ट्रातील अनेक तरुण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे.
प्रा. डॉ. श्री. महादेव दिनकर इरकर
कै.पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, विरार
ता. वसई, जि. पालघर
भ्रमणध्वनी – ७३८७१९४३६४
ई-मेल – mahadeoirkar@gmail.com





