विद्यार्थ्यांनो स्वतःची चांगली ओळख निर्माण करा -तानाजी नरळे


म्हसवड…. प्रतिनिधी
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल असून या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकष्ट करून स्वतःची चांगली ओळख निर्माण करावी असे आवाहन माजी शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी तानाजी नरळे तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर तसेच विशेष मान्यवर म्हणून सागर आनंदा बाबर व सत्कारमूर्ती प्रदीप हनुमंत बाबर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी तानाजी नरळे म्हणाले आजची युवा पिढी खूप नशीबवान आहे.

सुदैवाने आई-वडिलांकडून तुम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. जीवनात नेहमी सकारात्मक रहा. उच्च ध्येय ठेवा. ध्येय प्राप्तीसाठी जिद्द चिकाटी बाळगा. अवांतर वाचनाची सवय लावून घ्या. अभ्यासाबरोबरच खेळामध्ये सुद्धा सहभागी राहा. थोरामोठ्याकडून प्रेरणा घ्या. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी वाचन लेखन करून खेळात सहभागी व्हा. स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी स्वतःवर प्रेम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागृत करणे हे शिक्षकांचे कर्तव्य असल्याचे नरळे यांनी स्पष्ट केले. विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सांगून क्रांतिवीर शैक्षणिक संकुल आगामी काळात क्रांतिकारी ज्ञानमंदिर बनेल असा विश्वास तानाजी नळे यांनी व्यक्त केला.

राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून मुद्रांक शुल्क विभागात सहाय्यक म्हणूननिवड झालेल्या प्रदीप हनुमंत बाबर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य विन्सेंट जॉन यांनी प्रास्ताविक करून क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वर्षभर राबविलेल्या क्रीडा स्पर्धा व उपक्रमाची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी ,मेडल व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक अभिजीत माने यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार उपशिक्षिका तनुजा माने यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *