विशेष वृत्त म्हसवड वृत्तसेवा – हिंगणी (ता. माण) : हिंगणी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. २ जून २०२६) आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. ग्रामीण मार्ग क्र. १४४ संदर्भातील प्रश्नावर ग्रामसभेत कोणतीही चर्चा न झाल्याने आणि संबंधित अधिकारी बैठकीतून निघून गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हा आंदोलनात्मक निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी ग्रामपंचायतीने दि. २६ मे २०२६ रोजी मारुती मंदिर, हिंगणी येथे ग्रामसभा आयोजित केली होती. मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नियोजित ठिकाणी ग्रामसभा न घेता ग्रामपंचायत कार्यालयातच बैठक घेऊन ती तहकूब करण्यात आली होती. त्यावेळी पुढील ग्रामसभा दि. २ जून २०२६ रोजी घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार आज मारुती मंदिर येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या ग्रामीण मार्ग क्रमांक १४४ या विषयावर कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या विषयावर वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी बैठकस्थळ सोडून निघून गेल्याचा आरोपही उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत निषेध व्यक्त केला. प्रशासनाकडून ग्रामीण मार्ग क्र. १४४ संदर्भात ठोस भूमिका जाहीर करण्यात यावी, तसेच ग्रामस्थांच्या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, ग्रामस्थांच्या मागण्यांवर लवकरच चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे हिंगणी गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ग्रामीण मार्ग क्र. १४४ चा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. Post navigation म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे