म्हसवडमध्ये हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांची कारवाई; 26 हजारांचा मुद्देमाल जप्त म्हसवड, ता. माण (प्रतिनिधी) : म्हसवड पोलिसांनी बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीविरोधात धडक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून सुमारे 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 31 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास म्हसवड शहर हद्दीतील साई धाब्याच्या खालील बाजूस असलेल्या बंधाऱ्याच्या आडोशाला बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार म्हसवड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत झिमल गुलाब चव्हाण (वय 49, रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) याच्या ताब्यातून 200 लिटर काढीव हातभट्टीची दारू तसेच हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे 800 लिटर आंबट गुळचट वासाचे रसायन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 200 लिटर हातभट्टी दारू (किंमत 10 हजार रुपये), दोन प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले 400 लिटर रसायन (किंमत 8 हजार रुपये) तसेच दोन लोखंडी बॅरलमध्ये साठवलेले आणखी 400 लिटर रसायन (किंमत 8 हजार रुपये) यांचा समावेश आहे. एकूण 26 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) आवश्यक नमुनेही घेण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 150/2026 अन्वये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (क), (ड) व (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार (ब. नं. 429) करीत आहेत. म्हसवड पोलिसांनी अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात कारवाईची मोहीम सुरू ठेवली असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. Post navigation स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी