पंढपूर पोलीसाची कामगिरी . पंढरपूर, दि. २ : पंढरपूर ग्रामीण हद्दीत होणारा एक बालविवाह रोखण्यात निर्भया पथकाला यश आले असून, त्यांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य अंधारमय होण्यापासून वाचले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. निर्भया पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंढरपूर ग्रामीण परिसरात सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. माहिती मिळताच पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. नवरदेवाच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे विवाहस्थळाचा शोध घेत पोलिसांनी संबंधित ठिकाणी धडक देत बालविवाहाची कार्यवाही थांबविली. यावेळी निर्भया पथकाने मुलीच्या नातेवाईकांची चौकशी केली असता त्यांनी मुलीचे आधारकार्ड सादर केले. त्यामध्ये मुलीचे वय १७ वर्षे ५ महिने असल्याचे आढळून आले. मात्र, अधिक खात्री करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास करत मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला मागविला. त्या दाखल्यावरूनही मुलीचे वय १७ वर्षे ५ महिने असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ती अल्पवयीन असल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी विवाहस्थळी उपस्थित मंडळी तसेच मुलीच्या पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशीर परिणाम याबाबत समुपदेशन केले. पोलिसांच्या समजुतीनंतर संबंधित कुटुंबीयांनी विवाह स्थगित करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर सदर बालविवाह रोखण्यात आला. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, निर्भया पथकाने पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलींच्या आयुष्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. आपल्या परिसरात, नातेवाईकांमध्ये किंवा ओळखीच्या ठिकाणी अशा प्रकारचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने निर्भया पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.) प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव-रावण, महिला पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे, शाहिन, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत सावंत, लक्ष्मण कुचेकर, पांडुरंग टिंगरे व काझी यांनी सक्रिय सहभाग घेतला. Post navigation वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे