प्रत्येक झेडपी गटाला २१ कोटींचा निधी द्यावा – महेश करचे यांचे ग्रामविकास मंत्री गोरे यांना आवाहन


म्हसवड : प्रतिनिधी
माण-खटावचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण-खटाव तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी कुकुडवाड गटातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार महेश करचे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात जाहीर केलेली निधी योजना सातारा जिल्ह्यातही राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील राजकीय आणि विकासात्मक दिशा स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर उपस्थित होते.

  करचे म्हणाले की, कुकुडवाड गटाची निवडणूक जिल्ह्यात विशेष लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याची चर्चा झाली, तरीही जनतेने दिलेला निकाल आम्ही मान्य करतो. आता मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी मिळून सर्वांगीण विकासासाठी काम करणे गरजेचे आहे. निवडणुकीत विजयी झालेले अनिल देसाई आणि पराभूत झालेले अरुण गोरे यांनी विकासासाठी काम करण्याची भूमिका मांडली आहे, त्याचे स्वागत आहे. मात्र विकासाची ठोस दिशा, नियोजन आणि कालमर्यादा स्पष्ट केली पाहिजे. मी स्वतः गटातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असून गरज पडल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

  करचे पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील प्रचारादरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तीच योजना सातारा जिल्ह्यात, विशेषतः माण-खटाव तालुक्यात राबवली पाहिजे. माण-खटाव तालुक्यात त्यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले असून ज्या ठिकाणी उमेदवार विजयी झाले नाहीत, तिथेही मोठ्या प्रमाणावर मतदान मिळाले आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता सर्व जिल्हा परिषद गटांना समान निधी देऊन विकासाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी आमची ठाम मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *