लिपिक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘आम आदमी पार्टी’ आणि ‘अखंड मराठा समाजा’चा जाहीर पाठिंबा


ग्रामविकास मंत्र्यांनी अधिवेशनात आवाज उठवावा – सोहम शिर्के
माण (जि. सातारा) :
ग्रामीण प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा असलेल्या ग्रामपंचायत व पंचायत समिती लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय व सामाजिक स्तरावर पाठिंबा मिळू लागला आहे. अखंड मराठा समाज सेवक, माण-खटाव जनता सेवक तथा सातारा जिल्हा उपाध्यक्ष, आम आदमी पार्टी सोहम शिर्के यांनी ‘आम आदमी पार्टी’ आणि ‘अखंड मराठा समाजा’च्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
सोहम शिर्के यांनी निवेदनात नमूद केले की, ग्रामपंचायत व लिपिक वर्गाच्या वेतन त्रुटी दुरुस्ती, पदोन्नतीतील प्रलंबित प्रश्न आणि इतर सेवा विषयक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून, अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झाले आहे.
“सरकारी योजना घराघरापर्यंत आणि तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य हे कर्मचारी करत असतात. त्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे रखडत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे,” असे सोहम शिर्के यांनी स्पष्ट केले.
सध्या महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असताना कर्मचारी रस्त्यावर आंदोलन करत आहेत, ही परिस्थिती योग्य नसल्याचे मत व्यक्त करत त्यांनी सांगितले,
“एकीकडे कर्मचारी रस्त्यावर आणि दुसरीकडे सरकार सभागृहात — हे चित्र बदलणे आवश्यक आहे.”
सोहम शिर्के यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना विनंती केली आहे की, त्यांनी या विषयावर अधिवेशनात ठोस भूमिका मांडून संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवावी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’तर्फे मंत्र्यांना लवकरच लेखी पत्र देण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होत असून, शासन या प्रश्नावर कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *