नागपूर: राहुल खरात…
विद्येची देवता सावित्रीबाई फुले आणि सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा जपत, नागपूर शहरात एक आदर्श सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीचे औचित्य साधून सत्यशोधिका प्रतीक्षा सुरेश पोहनकर आणि सत्यशोधक विकास दत्तात्रय बोराटे हे दोघे ‘प्रेम, सामंजस्य, विवेकबुद्धी आणि समता’ या चतु:सूत्रीवर आधारित आपल्या सहजीवनाची सुरुवात करणार आहेत.
सोहळ्याचे खास आकर्षण: ‘मी सावित्रीमाई फुले बोलतेय’
केवळ लग्न विधीच नव्हे, तर वैचारिक प्रबोधनाचा वारसा या सोहळ्यातून जपला जाणार आहे. लग्नापूर्वी सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर येथील प्रसिद्ध सादरकर्त्या सौ. गायत्री रामटेके यांचा ‘मी सावित्रीमाई फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर होणार आहे. पारंपरिक कर्मकांडांना फाटा देऊन विचारांची पेरणी करणारा हा उपक्रम पाहुण्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.
विधी आणि आयोजक
हा विवाह सोहळा सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता श्री सिद्धेश्वर सभागृह, तुकडोजी पुतळा जवळ, नागपूर येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सदस्य आणि ख्यातनाम सत्यशोधक रघुनाथ ढोक हे या विवाहाचे विधीकर्ते आणि आयोजक आहेत.
समता आणि विवेकाची कास
”सहजीवनाला असलेली सामाजिक व कायदेशीर मान्यता म्हणजे लग्न,” असा संदेश देत पोहनकर आणि बोराटे परिवाराने या विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या पुरोगामी निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत असून, ज्येष्ठ पत्रकार राहुल खरात व मित्रपरिवाराने आयोजक रघुनाथ ढोक सरांचे विशेष अभिनंदन केले आहे.
या सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन समस्त पोहनकर-बोराटे परिवाराकडून करण्यात आले आहे.
नागपुरात रंगणार आगळावेगळा ‘सत्यशोधक’ विवाह सोहळा; महात्मा फुलेंच्या जयंतीचे औचित्य
