क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये “हॅपी क्लास रूम्स ” सी बी एस ई प्रशिक्षण संपन्न

म्हसवड… प्रतिनिधी
बदलत्या काळातील आव्हाने पेलत असतानाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वर्गखोल्या कशा प्रकारे आनंददायी बनवता येतील, यावर शिक्षकांना मार्गदर्शन करणारे ‘हॅपी क्लासरूम्स’ (Happy Classrooms) हे एक दिवसीय क्षमता निर्माण प्रशिक्षण नुकतेच क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई म्हसवड येथे उत्साहात संपन्न झाले.

कृषी विकास प्रतिष्ठानच्या सचिव माननीय सौ. सुलोचना बाबर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात क्रांतिवीर स्कूलच्या शिक्षकांसह मेरी माता स्कूलचे उपप्राचार्य, समन्वयक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी प्रमुख मार्गदर्शक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.

यामध्ये सांगली जिल्हा ट्रेनिंग कोऑर्डिनेटर आणि ‘सरस्वती ग्लोबल सीबीएसई स्कूल’च्या अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड विजेत्या प्राचार्या सौ. सुमिता सूर्यवंशी तसेच अनुभवी शिक्षणतज्ज्ञ व ‘लीड स्कूल (कुर्डूवाडी)’चे प्राचार्य सतीश गोसावी या दोन्ही तज्ज्ञ मार्गदर्शकांचा तथा प्रशिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मेरी माता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या सौ.जवळकोटी यांचा सत्कार क्रांतिवीर स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुवर्णा टाकणे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना शाळेचे समन्वयक श्री. अभिजीत सावंत यांनी राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक बदलांचा वेध घेतला. नुकतेच ज्येष्ठ मराठी आय.ए.एस. अधिकारी श्री. प्रशांत लोखंडे यांनी CBSE चे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशाच्या सर्वोच्च शैक्षणिक स्तरावर आणि आजच्या प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून लाभलेले दोन्ही प्रशिक्षक मराठी मातीतील असणे, हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात बदलत्या काळातील शिक्षकांच्या भूमिकेवर विशेष प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आजचे विद्यार्थी कमालीचे हुशार, सक्रिय आणि सजग आहेत म्हणूनच शिक्षकांनीही सातत्याने ज्ञान संपादन करत स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, वर्गात जाण्यापूर्वी शिक्षकाची स्वतःची ज्ञानाच्या आधारे पूर्ण तयारी असायला हवी व त्यांनी सातत्याने ज्ञान संपादन करायला हवे. जोपर्यंत शिक्षक स्वतः मनातून आनंदी राहत नाही, तोपर्यंत तो विद्यार्थ्यांना आनंदी ठेवू शकत नाही. त्यामुळे शिक्षकांनी स्वतः आनंदी राहून, आपल्या पूर्वतयारीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर वर्ग अतिशय प्रभावीपणे हाताळायला हवा.

तसेच प्राचार्य श्री.विन्सेंट जॉन यांनीही शिक्षकांना नेहमी उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आवाहन करत आपले विचार मांडले.

मुख्य सत्रात सौ.सुमिता सूर्यवंशी व श्री. सतीश गोसावी या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शिक्षकांशी थेट संवाद साधला. वर्गखोल्या कशा प्रकारे तणावमुक्त, आनंददायी आणि विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी पोषक बनवता येतील यावर त्यांनी अत्यंत व्यावहारिक व नाविन्यपूर्ण तंत्रे शिक्षकांना शिकवली.

प्रशिक्षणाच्या शेवटी सुवर्णा टाकणे, अशोक हांडे आणि सुप्रिया मोरे या शिक्षकांनी हे प्रशिक्षण अत्यंत अभ्यासपूर्ण, डोळे उघडणारे आणि वर्गात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचा सकारात्मक अभिप्राय दिला.

कार्यक्रमाचा समारोप उपशिक्षक श्री. वैशाख यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *