जांभुळणी, प्रतिनिधी : मौजे जांभुळणी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी होत असलेल्या जागेचे संरक्षण, सदर जागा कायमस्वरूपी आरक्षित करणे तसेच ग्रामपंचायत कारभारातील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या मागणीसाठी दि. १ जूनपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले आहे. गटविकास अधिकारी श्री. प्रदीप शेंडगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

माणदेशी कवी दत्ता कोकरे व सामाजिक कार्यकर्ते सुनील काळे यांनी सुरू केलेल्या या आमरण उपोषणाला ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. उपोषणाच्या काळात अनेक मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना नैतिक बळ दिले.

या लढ्यास सामाजिक कार्यकर्ते महेश करचे, प्रा. सचिन होनमाने, बाळराजे विरकर, सुभेदार छगन कोकरे, माजी सरपंच भास्कर काळे, विक्रम कोकरे, महावीर पुकळे, धनाजी पुकळे, ॲड. प्रविण कोकरे, अक्षय जानकर, सुरेश गोरड, शिवरामभाई मासाळ, पोलीस पाटील सुभाष काळेल आदींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संदीप पोमण यांनी आंदोलन शांततेत व कायदेशीर मार्गाने पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

आज गटविकास अधिकारी श्री. प्रदीप शेंडगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर त्यांच्या हस्ते उपोषणकर्ते दत्ता कोकरे व सुनील काळे यांनी लिंबूपाणी प्राशन करून आपले आमरण उपोषण मागे घेतले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळ, जांभुळणीच्या वतीने या लढ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे, पत्रकार बंधूंचे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे, विविध संघटनांचे आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी बोलताना उपोषणकर्ते दत्ता कोकरे व सुनील काळे म्हणाले, “गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेला हा लढा जनएकजुटीच्या बळावर यशस्वी झाला आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने गावकऱ्यांचा लोकशाही मार्गावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. भविष्यातही समाजहिताच्या प्रश्नांवर अशीच एकजूट कायम राहावी, हीच अपेक्षा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
अहिल्यादेवी जयंती स्थळाच्या मागणीसाठीचे आमरण उपोषण यशस्वी; त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन    |    “निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!