माण-खटाव वाचवा: भ्रष्टाचार व प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात सर्वांगीण विकासासाठी आमरण उपोषणाचा इशारा

बिदाल प्रतिनिधी : ___

माण-खटाव तालुक्यातील नागरिक व शेतकरी सध्या विविध मूलभूत समस्यांनी त्रस्त असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. तालुक्यातील तलाव-नालाबांध धोक्याच्या स्थितीत आले असून, पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर महावितरणमधील अनियमितता आणि PM कुसुम सोलार योजनेतील त्रुटींमुळे हजारो शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. 

तालुक्यातील आरोग्य, वीज, पाणी, शिक्षण, रस्ते आणि प्रशासन या सर्वच पातळ्यांवर सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांचा अभाव, ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, अॅम्बुलन्स सेवेतील अडथळे, पशुवैद्यकीय डॉक्टरांची अनुपलब्धता, शाळांमधील वीज समस्या, वारंवार होणारे वीज खंडित होणे, तसेच तीव्र पाणीटंचाईमुळे अनेक गावांमध्ये टँकरची मागणी वाढली आहे. याशिवाय “लाडकी बहीण” योजनेतील प्रलंबित रकमेबाबत माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना जिल्हा स्तरावर धावपळ करावी लागत असून, तालुका स्तरावरील कार्यालये निष्क्रिय असल्याच्या तक्रारी आहेत.

या आंदोलनात आम आदमी पार्टीचे सर्व राज्यस्तरीय नेते सहभागी होणार असून, प्रदेश संघटन मंत्री संदीप देसाई तसेच सातारा जिल्हाध्यक्ष धीरज जाधव हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच या आंदोलनातून जनतेला कसा प्रत्यक्ष फायदा होईल, यासाठी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग कसा वाढवता येईल याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली माण-खटावमध्ये व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीज, पाणी, शेतकरी हक्क, रोजगार, शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि माण-खटावचा सर्वांगीण विकास या मूलभूत मुद्द्यांसाठी हे आंदोलन उभारले जात असून, “भ्रष्टाचारमुक्त प्रशासन” हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

प्रशासनाने या सर्व प्रश्नांवर ३० एप्रिलपर्यंत ठोस व अंमलात येणारा निर्णय घ्यावा, अन्यथा १ मेपासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने या प्रश्नांची दखल घेऊन कार्यवाही न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

“माण-खटावमधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, यामध्ये होत असलेल्या निष्काळजीपणाविरोधात आता जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. वीज, पाणी, शेतकरी हक्क, रोजगार, शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि सर्वांगीण विकासासाठी हा लढा निर्णायक ठरेल,” असे – सोहम शिर्के, जिल्हाउपाध्यक्ष व प्रवक्ता, आम आदमी पार्टी, सातारा, सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलनक यांनी सांगितले.

माण-खटावमधील सर्व नागरिक, शेतकरी, युवक व महिलांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
अपहरण झालेल्या व्यक्तीने आरोपीला घेऊन सातारा जिल्हा परिषद सभागृहात दिली धडक    |    माण-खटाव वाचवा: भ्रष्टाचार व प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात सर्वांगीण विकासासाठी आमरण उपोषणाचा इशारा    |    सूरज दादा पाटील यांची जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या समित्यांवर निवड;मायणीत जल्लोष!    |    पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर    |    17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान    |    मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन    |    शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.    |    क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!