१९६५च्या पाकिस्तान युद्धात काश्मिर युद्धभूमीत लढलेला बार्शीचा भूमिपुत्र

माजी सैनिक लक्ष्मण माळी यांचे वय ९५ वर्षे पण चपळाई मात्र तरुणाला लाजवेल अशीच!

(राजा माने यांजकडून)
बार्शी, दि. ३:- आज जगाचे लक्ष अमेरिका – इस्त्रायल विरुद्ध इराणच्या युद्धाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या भूमिपुत्राने १९६५च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात दाखविलेले शौर्य आणि आज वयाच्या ९४ वर्षीही आपली प्रकृती ठणठणीत राखून माजी सैनिक कल्याण चळवळ आणि त्यांच्या दैनंदिन कामातील त्यांची चपळाई पाहून आपण अचंबित होतो. तरुणांना लाजवेल असा उत्साह संपादन करणाऱ्या त्या ९५ वर्षीय तरुणाचे नाव आहे लक्ष्मण विठ्ठल माळी!
काल प्रस्तुत प्रतिनिधी शिवशक्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक विजय शिखरे यांच्या समवेत येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेला होता. सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक विक्रम निचळ यांच्या दालनात त्यांच्याशी संवाद सुरु असताना,ते अचानक म्हणाले “थांबा, तुम्हाला आताच बँकेत आलेल्या एका व्यक्तीची भेट घालून देतो. तुम्ही फक्त त्यांचे वय ओळखायचे!”. विक्रम निचळ यांच्या या विधानाने थोडे आश्चर्य वाटले पण उत्सुकता ताणली गेली. पांढरा शुभ्र विजार शर्ट पेहरावाची कडक बांध्याची व्यक्ती हातात बँक स्लिप आणि डोळ्यावर नव्हे तर हातातच चष्मा असलेली व्यक्ती आमच्या पुढच्या आली,मग काय, निचळ म्हणाले,” यांचे वय ओळखा?”.आम्ही अंदाज बांधू लागलो पण आमचा अंदाज ५५ -६० वर्षांच्या पुढे जाईना.अखेर निचळ यांनी त्यांचे वय आणि इतर माहिती सांगितली,बँक स्लिप भरणे असो वा अन्य कोणतेही काम असो ते कुणाचीही मदत घेत नाहीत,हेही आवर्जून सांगितले.मग आम्ही लक्ष्मण माळी यांच्याशी संवाद सुरु केला.खणखणीत आवाजात ते बोलत होते. भारतीय सैन्यात दाखल कसे झाले इथपासून १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत काश्मिर युद्धभूमीत ते आणि त्यांची मराठा बटालियन कशी लढली याची शौर्यगाथा त्यांनी काही मिनिटात कथन केली.आज माजी सैनिक कल्याण चळवळीत ते आघाडीवर आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहेत.त्या दोहोंना एक किराणा दुकान त्यांनी थाटून दिले.एक नात व नातू यांच्या पालन – पोषणाबरोबरच दुकानातील कामे आणि व्यवहार ते स्वतः सांभाळतात. लष्करात सेवा बजावूनही ते निर्व्यसनी तर आहेतच शिवाय ते शाकाहारी असल्याचे अभिमानाने सांगतात. पहाटे पाच वाजता उठणे आणि नियमित फिरणे या पलिकडे वेगळा कुठलाही व्यायाम करीत नाहीत. शिस्तबद्ध जीवन आणि जंकफूडच्या जवळही न फिरकणारा घरचा साधा आहार हे त्यांच्या जीवनशैलीचे वैशिष्ठ्य आहे.त्याचे घर आणि छोटेसे किराणा दुकान येथे फुले प्लॉट परिसरात आहे.१९७३ साली भारतीय लष्करातून हवालदार या पदावर निवृत्त होताना त्यांचे वजन होते ५७ किलो आणि आज त्याचे वजन ५६.५किलो आहे.
१९६५ साली पाकिस्तानने काश्मिर खोऱ्यात घुसखोरी केली आणि युद्ध सुरु झाले. भारतीय सैन्याने आपले सामर्थ्य सिद्ध केले व युद्ध जिंकल्याचा दावा केला. संयुक्त राष्ट्र संघाच्या मध्यस्थीने ते युद्ध थांबले होते. त्यानंतर १९६६ साली ऐतिहासिक ताश्कंद करार झाला. या इतिहासातील नोंदी लक्ष्मण विठ्ठल माळी या माजी सैनिकाच्या भेटीने नव्याने आठवल्या. बार्शीच्या या राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्त भूमिपुत्रास मनाचा मुजरा, वंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *