म्हसवड वृत्तसेवा ..

दिनांक : 15 जून 2026 (सोमवार)माणगंगा शैक्षणिक संकुलात नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे संस्थेच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसंत मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य श्री. रावसाहेब मासाळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजी पवार, नवनाथ मासाळ आणि रावसाहेब शिर्के हे प्रमुख उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

गेल्या दशकभरापासून ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे माणगंगा शैक्षणिक संकुल आज गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखले जाते. नर्सरी ते इयत्ता अकरावीपर्यंतचे शिक्षण तसेच DMLT व पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्था विद्यार्थ्यांना सर्वांगीण प्रगतीची संधी उपलब्ध करून देत आहे. अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, क्रीडा व कला गुणांना प्रोत्साहन, सुरक्षित बससेवा, अनुभवी चालक आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची संस्कृती यामुळे संस्थेने पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विशेष विश्वास संपादन केला आहे.

प्रवेशोत्सवानिमित्त लहान विद्यार्थ्यांना वही, पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान दिसून आले.

शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि संस्कारांचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, संस्कार आणि यशाची नवी दिशा ठरो, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. प्रवेशोत्सवामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *