श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक स्थळाची पंढरपुरात अधिकृत पाहणी संपन्न पंढरपूर | श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी शासनाने मंजूर केलेल्या जागेची गुरुवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी स्थळ पाहणी यशस्वीरित्या पार पडली. या स्थळ पाहणीपूर्वी श्री केशवराज संस्था, नामदेव मंदिर, पंढरपूर येथे सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये नामदेव महाराज यांच्या वंशजासह समाजबांधव, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर भक्ती सागर परिसरात, चंद्रभागा नदीच्या पलीकडे असलेल्या सुमारे 65 एकर क्षेत्रालगत स्मारकासाठी प्रस्तावित जागेची अधिकृत पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी उपविभागीय अधिकारी पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रकल्प सल्लागार उपस्थित होते. श्री संत नामदेव महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी आराखडा व नियोजन प्रक्रिया वेग घेणार असून, ही पाहणी समाजासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण ठरली. या वेळी नामदेव महाराज वंशज,नामदेव समाजोन्नती परिषद,श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ,श्री केशवराज संस्था पंढरपूर व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. स्थळ पाहणीनंतर सर्व उपस्थितांसाठी नामदेव मंदिर येथे भोजन व्यवस्था करण्यात आली. श्री संत नामदेव महाराज स्मारक उभारणीसाठी सुरू झालेली ही प्रक्रिया समाजाच्या ऐक्याचे व श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. Post navigation श्री सिद्धनाथ मंदिर भुयार महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी खुले राहणार झरे नगरीत ३५ वा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न