दहिवडी प्रतिनिधी जयराम शिंदे
माण तालुक्यातील विरकरवाडीची सुकन्या आकांक्षा शंकर विरकर यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० (ब) मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका पदावर दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला आहे. हा विजय म्हणजे जनतेचा विश्वास, सातत्यपूर्ण समाजकार्य आणि तरुण नेतृत्वावरची ठाम पसंती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुशिक्षित, सक्रिय व तरुण चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकांक्षा विरकर यांना निवडणुकीदरम्यान तरुण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. बी.कॉम व फॅशन डिझायनिंगमध्ये पदवीधर असलेल्या आकांक्षा विरकर या महाराष्ट्र राज्य मल्लविद्या महासंघाच्या महिला अध्यक्षा तसेच भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.
या विजयामुळे माण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विरकरवाडी परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थ, युवक, महिला व विविध सामाजिक संघटनांकडून आकांक्षा विरकर यांचे कौतुक केले जात आहे. “माण तालुक्याची कन्या मोठ्या शहरात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे, ही अभिमानाची बाब आहे,” अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील या विजयामुळे भाजपला प्रभाग क्रमांक १० मध्ये अधिक बळ मिळाले असून, पक्षसंघटनेतही उत्साह संचारला आहे. आकांक्षा विरकर यांच्या विजयामुळे तरुण नेतृत्वाला संधी देण्याची भाजपची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या कार्यशैलीत पारदर्शकता, लोकसहभाग आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असल्याने येत्या काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नगरसेविका म्हणून काम करताना पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व बालकल्याण, युवकांसाठी कौशल्यविकास आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा संकल्प आकांक्षा विरकर यांनी व्यक्त केला आहे. “जनतेने दाखवलेला विश्वास विकासकामांतून सार्थ ठरवणार,” अशी ग्वाही त्यांनी दिली असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी महानगरपालिकेचे दालन नेहमी खुले राहील, असेही त्या म्हणाल्या आहेत.
एकूणच, माण तालुक्यातील विरकरवाडीच्या या कन्येने मिरा-भाईंदरच्या राजकारणात भक्कम पाऊल टाकत प्रेरणादायी यश संपादन केले आहे. हा विजय केवळ वैयक्तिक नसून, ग्रामीण भागातील तरुणींसाठी आशेचा किरण ठरणारा असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
माण तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या यशाबद्दल आकांक्षा विरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून, त्यांच्या माध्यमातून प्रभाग १० मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
