मायणी: दिलीप पुस्तके….महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वडूज आगारात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मायणी बसस्थानकात विद्यार्थी पास वितरणात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वडूज आगार प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. संबंधित वाहतूक नियंत्रकाला (Traffic Controller) तात्काळ निलंबित करण्यात आले असून, या धडक कारवाईमुळे एसटी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२६ रोजी मायणी बसस्थानकातील विद्यार्थी पास रजिस्टरची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान २ जुलै २०२६ रोजीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सोमनाथ महेश घोडके या विद्यार्थ्याने ‘मायणी ते म्हासुर्णे’ या प्रवासासाठी विद्यार्थी पास मंजुरीसाठी अर्ज केला होता.या पासची अधिकृत फी ₹६०० असताना, तिथले वाहतूक नियंत्रक श्री. विजय पांडुरंग पळे यांनी विद्यार्थ्याला केवळ ₹४०० ची अधिकृत पावती दिली आणि उर्वरित ₹२०० ची रक्कम स्वतःकडे ठेवून घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्रशासनाचा कारवाईचा बडगा एसटी महामंडळाच्या आर्थिक नियमांचे उल्लंघन आणि गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरवर्तन मानून वडूज आगार प्रशासनाने आगार आस्थापना आदेश क्र. ९७९२ नुसार १३ जुलै २०२६ रोजी विजय पळे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.निलंबन काळातील अटी: निलंबित कर्मचाऱ्याला दररोज सकाळी १० वाजता वडूज आगार व्यवस्थापक कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू या प्रकरणाची आता सखोल विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित आदेशाच्या प्रती कर्मचारी वर्ग अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, विभागीय वाहतूक अधीक्षक आणि विभागीय लेखाधिकारी यांना पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध पुढील कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. “विद्यार्थी सवलत योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पास प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक संदेश या कारवाईच्या माध्यमातून एसटी प्रशासनाने दिला आहे. Post navigation पिंपरी (ता. माण) येथे भीषण अपघात; इको कारच्या धडकेत ६७ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू