सांगोला विद्यामंदिरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता सन्मान सांगोला (प्रतिनिधी):आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. शिक्षकांनी या बदलत्या काळातील नवीन कौशल्ये आणि तंत्रज्ञान अवगत करून नवनवीन आव्हाने धैर्याने स्वीकारली पाहिजेत. समाजाला दिशा देण्याचे आणि विद्यार्थ्यांचे कल्याण करून एक उत्तम नागरिक घडविण्याचे प्रमुख कार्य शिक्षकांनी अविरतपणे करत राहावे, असे प्रतिपादन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.लायन्स क्लब,महाराष्ट्र साहित्य परिषद,नगर वाचन मंदिर,साने गुरुजी कथामाला व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त शिक्षक सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य चारुदत्त जगताप, साने गुरुजी कथामाला अध्यक्ष भीमाशंकर पैलवान, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रशांत रायचुरे उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा.झपके म्हणाले साने गुरुजी यांच्या तत्त्वाने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या विद्यामंदिरमध्ये १९७९ पासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा अविरत सुरू आहे,उपक्रमांतून आत्मीयता निर्माण होते असे सांगत आयोजनाबद्दल संस्थांना धन्यवाद दिले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्राचार्य चारुदत्त जगताप यांनी प्रास्ताविकात सत्कार समारंभाची भूमिका स्पष्ट करत शिक्षकांचा सन्मान करणे हे समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे सांगत उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष भीमाशंकर पैलवान यांनी ज्ञान, कौशल्य व मूल्यांची रुजवण करणाऱ्या सर्व शिक्षकांना अभिवादन केले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाबरोबरच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना लोकांनी ‘शिक्षक’ म्हणून लक्षात ठेवावे अशी त्यांची स्वतःची इच्छा होती, याचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये उच्च क्षमतेचा शोध, औत्सुक्य आणि प्रश्न विचारण्याची क्षमता निर्माण करण्याचे महत्त्व विशद केले. कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके हे विद्यार्थी बहुश्रुत होण्यासाठी सदैव प्रयत्नशील असत आणि त्यांच्या निसर्गाविषयीच्या आस्वादाची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे यासाठी शिक्षकांनी त्यांना ‘चांदोबा’, ‘इसापनीती’, ‘किशोर’ यांसारखी मासिके वाचण्यास प्रवृत्त करावे व विद्यार्थ्यांशी हितगुज साधावे असे म्हणाले.सत्कारमूर्तींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय पांचाळ भावुक झाले. पवित्र शिक्षक पेशातील हा सन्मान पवित्र श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी होत असल्याबद्दल त्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला.संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचे सार्थक पंढरपूरला आल्याने झाले, तसेच माझ्या आयुष्याचे सार्थक या शिक्षक पेशात झाले, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा दिल्या.या शानदार सोहळ्यामध्ये सेवानिवृत्त प्राचार्य बिभीषण माने, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, सेवानिवृत्त शिक्षक उत्तम सोनलकर,चंद्रकांत इंगळे, जालिंदर राऊत, दत्तात्रय पांचाळ, सेवानिवृत्त पर्यवेक्षक दशरथ जाधव आणि सेवानिवृत्त लिपिक भारत मेटकरी यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशासकीय अधिकारी यांचा लायन्स क्लबतर्फे प्रमाणपत्र देण्यात सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब,महाराष्ट्र साहित्य परिषद,नगर वाचन मंदिर,साने गुरुजी कथामाला व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर ला.प्रशात रायचुरे यांनी आभार प्रदर्शन केले. Post navigation हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचा ६ सप्टेंबरला सेवानिवृत्त गौरव सत्कार सोहळा वझरे येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा गौरव संपन्न..