सरकारला इशारा — मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य करा!

म्हसवड, दि. ६ सप्टेंबर २०२६ :

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनास समर्थन देण्यासाठी आज अखंड मराठा समाज, माण यांच्या वतीने म्हसवड येथे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोटारसायकलींच्या मोठ्या ताफ्यामुळे संपूर्ण म्हसवड शहरात मराठा एकजुटीचे दर्शन घडले.

रॅलीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“मनोज दादा, आप आगे बढ़ो… हम तुम्हारे साथ हैं!”
“महाराष्ट्रचे ३६ जिल्हे, मनोज दादांचे बालेकिल्ले!”
“एक मराठा, लाख मराठा!”
“मराठा खडा तो सरकार से बड़ा!”

अशा घोषणांनी संपूर्ण म्हसवड शहर दुमदुमून गेले.

यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजे उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्व महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

रॅलीनंतर म्हसवड पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण साहेब यांच्याकडे मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

सरकारला स्पष्ट इशारा!

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत सांगितले की, मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तातडीने सोडवावे.

माण-खटाव विधानसभा मतदारसंघात एकूण सुमारे ३ लाख ५२ हजार मतदानापैकी जवळपास १ लाख ६५ हजार मतदार मराठा समाजाचे असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास आगामी काळात लोकशाही मार्गाने आपली ताकद दाखवली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

“यावेळी मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला, तर पुढच्या काळात मराठा समाज मतदानाच्या माध्यमातून त्याचे उत्तर देईल,” असा स्पष्ट संदेश सरकारला देण्यात आला.

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडवावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

या रॅलीत अखंड मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— अखंड मराठा समाज, माण
माण-खटाव, सातारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी