नागपाडाबरोबर पुण्याची अंतिम फेरीत लढत

सांगोला ( प्रतिनिधी )
मुंबईचे नागपाडा बास्केटबॉल असोसिएशन व पुण्याच्या संभाजी कदम बास्केटबॉल अकादमीने गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५व्या स्मृती समारोहानिमित्त पुरूषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला
सांगोला विद्यामंदिरच्या बास्केटबॉलच्या इनडोर कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील रविवारी सकाळी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात बादल ( १३ गुण ) व तनय (८) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर पुण्याने नांदेडच्या नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमीस ६६-६२ असे चार गुणांनी नमविले. मध्यंतरानंतर तिसऱ्या डावात (१४-१४) व चौथ्या डावात (१९-२०) असे रोखताना नांदेडच्या संजय (२९ गुण ) व अमृत (९) यांनी पुण्याच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक केली. परंतु मध्यंतराची ३३-२८ ही आघाडीच पुण्यास विजय मिळवून दिली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात नागपाडा बास्केटबॉल असोसिएशनला बीडच्या जयहिंद स्पोर्ट्स अकादमीवर ८०-६३ अशी मात करताना विशेष प्रयास करावे लागले नाहीत. फैज शेख हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. फैजने तब्बल 24 गुण नोंदविले. मुस्तफा सय्यद(८) व अर्सलान खान (६) यांनी त्यास साथ दिली. बीडकडून साहिल सय्यद (११ गुण) व निलेश यादव (७) यांची लढत अपुरी पडली.

मास्टर्समध्ये सांगली, कोल्हापूर अंतिम फेरीत

मास्टर गटात सांगली व कोल्हापूरने अंतिम फेरी गाठली. साखळी पद्धतीने झालेल्या सामन्यात सोलापूरला दोन्ही सामने गमवावे लागले. सोलापूरवर सांगलीने ३४-९ व कोल्हापूरने ४४-२४ असे शानदार विजय मिळविले. सांगलीकडून राजू चव्हाण (४) प्रमोद (६) तर कोल्हापूरकडून सागर डोंगरे (१०), उपेंद्र कुलकर्णी (७) व सुनील पवार(१२) यांनी उल्लेखनीय खेळी केली. सोलापूरकडून डॉ. महेश ढेंबरे (४) व अन्सार इनामदार (८) यांनी लढत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी