फुले एज्युकेशन तर्फे शीतल इंगळे आणि शिवराज पिल्ले यांचा 57 वा.अंतरजातीय सत्यशोधक पुनर्विवाह सोहळा संपन्न झाला !!!

पुणे . थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची द्विशताब्दी जन्म वर्ष , व धर्मवीर संभाजी महाराज यांची 369 वी जयंती आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची 152 व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे रविवार दि.28 जून 2026 रोजी स.12 वाजता राजयोग प्लाझा ,वडगांव बु.पुणे 68 येथे जेष्ठ समाजसेवक भिका दशरथ इंगळे यांची दारिका सत्यशोधिका शीतल इंगळे (घटस्पोटीत ) BA, आणि कै.नटराज विरागू पिल्ले यांचे दारक सत्यशोधक शिवराज पिल्ले (घटस्पोटीत) 10 वी पास यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने 57 वा सत्यशोधक पुनर्विवाह सोहळा मोफत आईवडील भाऊ यांचे साक्षीने मोजक्याच आप्तेष्टांनसमवेत संपन्न झाला.

या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पार पाडले व महात्मा फुले रचित मंगलाष्टककाचे गायन आणि उद्देशिका वाचन गायिका करिश्मा टापरे हिने केले. तर यावेळी अक्षता म्हणून फुलांचे पाकळ्या वापरण्यात आले. यावेळी वधू वर याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व सन्मानपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम तसेच वधू वर यांचे आई वडील व मामा मामी आणि भाऊ वाहिनी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सत्यशोधक रघुनाथ ढोक ,आशा ढोक आणि करिष्मा टापरे यांचे हस्ते सन्मान पत्र देण्यात आले. विवाहाचे सुरुवातीला दारिका शीतल आणि दारक शिवराज यांचे राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात घेऊन फुलांच्या पायघड्यावरून आगमन करीत त्यांचे शुभहस्ते प्रथम ग्रंथांचे पूजन नंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच उपस्थितांनी देखील पूजन केले.वधू वरांनी स्वतंत्र पणे शपथ पत्राचे वाचन करताना पहिल्या अप्त्त्याचे योग्य सांभाळ व त्यास शिक्षण देत आम्ही पुढील योग्य तो निर्णय घेऊ म्हणत एकमेकांचे जीवनसाथी राहून निर्भय सत्यशोधक बनण्याचे अभिवचन दिले.

याप्रसंगी रघुनाथ ढोक म्हणाले की घटस्पोटीत शीतल इंगळे यांच्या 17 वर्षाचे मुलासह शिवराज आणि त्यांचे कुटुंबाने स्वीकार केला, त्या बद्दल संस्थेचे वतीने अभिनदन करण्यात आले. पुढे ते म्हणाले की , सर्व समाजातील पालकांनी आणि नातेवाईकांनी अशा घटस्पोटीत ,विधवा महिलांना घरी ठेवण्यापेक्षा अपत्य असले तरीदेखील त्यांचा पुनर्विवाह घडविण्यास सकारात्मक दृष्टीने पुढे येऊन मदत करणे काळाची गरज आहे..सध्या अनेक वधू वर यांचे विवाह रखडले असल्याचे जाणवत आहे, त्यामुळे वधू वरांनी आपले उर्वरित आयुष्य सुखमय जगण्यासाठी वेळीच विवाह करावेत असा अनमोल सल्ला देत , फुले एज्युकेशन संस्था सत्यशोधक पद्धतीने मोफत विवाह लावण्यासाठी देशभर उपलब्ध आहे असे देखील म्हंटले.

या विवाह सोहळयाचे सूत्रसंचालन सत्याशोधिका करिष्मा टापरे आणि मोलाचे सहकार्य आकाश – क्षितीज ढोक , शिवकुमार पिल्ले आणि इंगळे व पिल्ले परिवाराने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *