म्हसवड (वार्ताहर)-माणदेशी माणसं कुठेही दिसली, तरी आपुलकीने विचारपूस केल्याशिवाय राहात नाहीत… हीच खरी ओळख आहे आपल्या माणदेशाची.68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनासाठी मी पुणे, वाघोली येथे वार्तांकनासाठी गेलो होतो. दिनांक 18 ते 22 मार्च या कालावधीत तिथे मुक्कामी होतो. माझं स्टेटस पाहून अनेकांनी फोन करून, “आमच्याकडे या मुक्कामाला,” असं आग्रहाने सांगितलं. पण वेळेअभावी आणि कव्हरेजच्या धावपळीत कोणाकडेही जाता आलं नाही.तरीही, कुठेही गेलो तरी आपली माणदेशी माणसं तिथं भेटतातच!शेवटच्या दिवशी फायनलची कुस्ती झाल्यावर संपूर्ण मैदानात विजयाचा जल्लोष सुरू होता. क्रीडांगण तुडुंब भरलेलं… महाराष्ट्र केसरी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. त्या गर्दीत मी माझ्या कॅमेऱ्यात प्रत्येक क्षण टिपत होतो.याच वेळी, आपल्या माणदेशातील पळसावडे गावचे सुपुत्र आणि सध्या पुण्यात पीएसआय म्हणून कार्यरत असलेले सिद्धनाथ तात्यासो शेंडगे साहेब यांनी मला लांबून पाहिलं. गर्दीतून आम्ही एकमेकांना भेटलो.शहरात गेल्यावर माणदेशी माणूस भेटला की, क्षणभर वाटतं आपण आपल्या गावातच आहोत. ते माझे व्हिडिओ पाहतात, आणि मीही त्यांना सोशल मीडियावरून ओळखत होतो. पण ही आमची पहिली प्रत्यक्ष भेट होती. हातात हात देत त्यांनी अगदी आपुलकीने विचारपूस केली –“जेवण केलं का? मुक्कामाची सोय आहे ना? काही अडचण तर नाही ना?”मी त्यांना सांगितलं, “सगळं व्यवस्थित आहे, फक्त कव्हरेजची धावपळ सुरू आहे.”मीच त्यांना म्हणालो, “नंतर निवांत भेटूया.”माझ्यासोबत असलेला मित्र समाधान खांडेकर यांनी घाईघाईत आमचे फोटो काढले.एक तासानंतर सगळं आटपून आम्ही गावाकडे निघालो. गाडित बसून त्या फोटोंकडे पाहताना मनात एकच विचार येत होते. खरंच, माणदेशी माणसं किती लय भारी आहेत!माणदेशात पिढ्यानपिढ्या दुष्काळ होता, पण इथली माणसं डोक्याने हुशार होती, ज्ञानाचा मात्र सुकाळ होता. त्या काळात आपल्या लोकांनी मेंढरं राखून, मिळेल ते काम करून आपल्या पोरांना शिकवलं. आज तीच पोरं सूट-बुटात ऐटीत जनतेची सेवा करतायत कोणी अधिकारी, कोणी पोलीस, कोणी सैन्यात.अनेक युवक व्यवसायातही यशस्वी होत आहेत.आज माणदेश बदललाय, सुविधा वाढल्या आहेत… पण स्वभाव मात्र अजूनही तसाच आहे – आपुलकीचा!आपण ग. दि. माडगूळकरांच्या लेखनातून माणदेश वाचला, त्यांनी त्याकाळची माणसं, संस्कृती आणि वास्तव जगणं शब्दांत मांडलं.तेच डोळ्यासमोर ठेवून, आजच्या डिजिटल युगात मीही “डिजिटल माणदेश” डिजिटल प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करतोय.आणि या प्रवासात, पीएसआय सिद्धनाथ शेंडगे साहेबांसारखी माणसं अजून बळ देतात… सचिन नारायण शिंगाडे, संपादक – माणदेश प्राईम Post navigation महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन सातारा येथे संपन्न बाल आनंद मेळावा आदर्श उपक्रम – सभापती विक्रम शिंगाडे