म्हसवड वृत्तसेवा
बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन माण पंचायत समितीचे सभापती मा.श्री.विक्रम शिंगाडे यांनी पळसावडे येथे बाल आनंद मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. पळसावडे येथे पुळकोटी केंद्रसमूह अंतर्गत बाल आनंद मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी सरपंच नयना विलास चव्हाण, एडवोकेट विलास चव्हाण, टाटा पॉवर कंपनीचे विश्वास सोनवल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण शेंडगे, शिक्षण विस्तार अधिकारी शमीनबानू तांबोळी, केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे, पोलीस पाटील भाऊसाहेब चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थित सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. ते पुढे म्हणाले की पळसावडे हे गाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे तरीसुद्धा येथील परिसर शैक्षणिक दृष्ट्या चांगला आहे असे सांगून ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले असे स्पष्ट केले. तसेच टाटा पॉवर कंपनीकडून शाळेला मिळणार्या सहकार्याबद्दल कंपनीचे विशेष आभार व कौतुक केले. त्यानंतर त्यांनी प्राण्यांची गोष्ट सांगून शैक्षणिक विकासाला सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ व प्रशासन या सर्वांनी समन्वयातून काम केल्यास शाळेच्या गुणवत्ता वाढीस चालना मिळते. शिक्षण विस्तार अधिकारी तांबोळी यांनी सभापती यांच्या कार्याचा गौरव करून शैक्षणिक विकासात त्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे यांनी प्रास्ताविक करून केंद्रातील शाळांच्या भौतिक सुविधांची माहिती दिली व केंद्रातील शाळांची प्रगती तसेच शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांचे यश उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
सरपंच विलास चव्हाण यांनी सांगितले की गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी गावाचा सहभाग व शिक्षकांचा सहभाग त्याचबरोबर पंचायत समितीच्या वतीने सहकार्य केले तर निश्चितच शाळेचा विकास होत असतो. यावेळी त्यांनी सभापती विक्रम शिंगाडे यांना पंचायत समितीच्या माध्यमातून शाळेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. बाल आनंद मेळाव्यामध्ये केंद्रातील सर्व शाळांनी उत्कृष्ट व बहारदार गाण्यांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पळसावडे शाळेच्या देवा श्री गणेशा या गीताने झाली त्याचबरोबर शाळा आमची मराठी, डोंबारी गीत, विज्ञान लावणी, झाशीची राणी व फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का अशा वेगवेगळ्या नृत्यामधून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाविष्कार सादर केला. उपस्थित सर्वांची या कार्यक्रमासाठी वाहवा मिळाली. या कार्यक्रमामधून सभापती व मान्यवर यांच्या उपस्थितीत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व नवोदय निवड विद्यार्थी तसेच जिल्हास्तरावर विविध स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व गुणवंत शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन शिरताव शाळेचे उपशिक्षक मा. श्री. अनिल पाटोळे यांनी केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन किशोर शेंडे आणि नीलम तोरणे यांनी केले. कार्यक्रमासाठी आनंदराव गंबरे,दिगंबर बामणे, संजय पैकेकरी, प्रगती कलढोणे, सुरेश सातपुते, काशिनाथ तोरणे, राजकुमार भागवत, कल्पना शेंडे, बालाजी जाधव, बाबासाहेब औताडे आनंद घारुळे, विलास जाधव, दत्तात्रय कोलवडकर व संजय इंगवले त्यादी मुख्याध्यापक व तसेच सर्व उपशिक्षक, पालक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिरताव शाळेचे मुख्याध्यापक श्री सुशील त्रिगुणे यांनी मानले.
