साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह


सातारा – महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीचा एक आदर्श अनोखा आंतरजातीय विवाह सोहळा सदरबझार येथील कनिष्क मंगल कार्यालयात पार पडला.
महात्मा जोतीराव फुले- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याने १८४९ साली फेब्रुवारी मध्ये आपला दत्तक मुलगा डॉ. यशवंत याचा राधा ससाने यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला. या तारखेचे औचित्य साधून संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोल्हापूर विभागाचे निवृत्त अधिक्षक अभियंता, रमेश संभाजी इंजे यांची कन्या प्रा. सोनल इंजे व प्रसाद वंदना शहाजी येवले यांनी शासकीय विवाह निबंधक कार्यालयात नोंदणी केली व त्यानंतर सत्यशोधक पद्धतीची शपथ घेऊन अत्यंत साधेपणाने विवाह केला.
वधू-वरांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली. स्वागत समारंभास सर्व उपस्थिताना कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट चे मराठी भाषणाचे पुस्तक यावेळी देण्यात आले.
सोनल – प्रसाद या नवविवाहित दाम्पत्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून विवाह सोहळ्यातील अवांतर खर्चाला फाटा देऊन नवी मुंबईतील कचरा वेचक महिलांच्या परिसर सखी विकास संस्थेला वीस हजार व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कराड-कार्वे फाटा येथील महाविहार बांधकामासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली आहे .
या युनिक विवाहाच्या स्वागत समारंभास रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष , माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी नवविवाहित सोनल – प्रसाद या दांपत्याचे व या आंतरजातीय विवाहास संमती देणाऱ्या इंजे व येवले कुटुंबीयाचे अभिनंदन केले. नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इंदिरा आठवले- वाघ, औरंगाबाद येथील डॉ.पुष्पा बनसोडे, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत सांगलीचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, इंजे, येवले कुटुंबीय, नातेवाईक , निढळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी आदर्श व अनुकरणीय सत्यशोधक पद्धतीचा विवाह केल्याबद्दल नव दाम्पत्यांचे अभिनंदन केले.

डॉ. प्रल्हाद इंजे यांनी या विवाहाचे प्रयोजन सांगून उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. यशपाल बनसोडे यांनी वधू-वरांना सत्यशोधक शपथ दिली. या विधी सोहळ्यास चंद्रमणी बनसोडे यांनी सहकार्य केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदार निवड या उपक्रमातून साकार झालेल्या या विवाहाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी सत्यशोधक पद्धतीने अनोखा विवाह करणाऱ्या सोनल -प्रसाद दंपत्यांचा सत्कार करताना शेजारी डॉ. प्रल्हाद व रमेश इंजे, डॉ. इंदिरा आठवले – वाघ, दिनकर झिंब्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *