महाड–अक्कलकोट बसमधून विद्यार्थ्यांना निर्जनस्थळी सोडल्याचा प्रकार; मनसे आक्रमक!

गोंदवले बुद्रुक व गोंदवले खुर्द येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; चालक-वाहकांवर कठोर कारवाईची मागणी

:
महाड–अक्कलकोट एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित थांब्यावर न उतरवता निर्जनस्थळी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित चालक व वाहकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दहिवडी एसटी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी महाड आगाराची महाड–अक्कलकोट बस सातारा मार्गे दहिवडीकडे येत असताना गोंदवले बुद्रुक येथील एका युवतीने सातारा येथून गोंदवले खुर्दपर्यंतचे वैध तिकीट काढले होते. मात्र, संबंधित चालक व वाहक यांनी तिला गोंदवले खुर्द येथे न उतरवता गावापासून सुमारे दोन किलोमीटर पुढे निर्जनस्थळी सोडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दहिवडी बसस्थानकातून गोंदवले बुद्रुक व गोंदवले खुर्द येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. गोंदवले बुद्रुक येथील विद्यार्थिनींना गोंदवले खुर्दचे तिकीट देण्यात आले; मात्र बस गोंदवले बुद्रुक येथे न थांबता पुढे गेल्यानंतर गोंदवले खुर्दच्या पुढे सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील निर्जनस्थळी विद्यार्थ्यांना उतरविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही विद्यार्थ्यांना म्हसवड बसस्थानकावर सोडण्याचे प्रकारही घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रवासादरम्यान संबंधित चालक व वाहकांकडून विद्यार्थ्यांशी उद्धटपणे वागणे, अरेरावीची भाषा वापरणे, दमदाटी करणे आणि जाणीवपूर्वक त्रास देणे, अशा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. विशेषतः विद्यार्थिनींना भरदुपारी निर्जनस्थळी सोडणे हा त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर विषय असल्याचे मनसेने म्हटले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते.
या प्रकरणी महाड आगाराच्या महाड–अक्कलकोट बसवरील संबंधित चालक व वाहकांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, दहिवडी–म्हसवड–गोंदवले मार्गावरील सर्व एसटी बस गोंदवले बुद्रुक व गोंदवले खुर्द या अधिकृत थांब्यांवर थांबतील, याची सक्तीने अंमलबजावणी करावी, तसेच विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत चालक-वाहकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
सदर प्रकरणात ४८ तासांच्या आत योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती सातारा विभागाचे एसटी विभाग नियंत्रक, महाड आगार व्यवस्थापक आणि दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.
या निवेदनावेळी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, विठ्ठल जाधव, प्रथमेश नवले, शुभम खांडे, सूरज कदम, अनिल जाधव, निलेश सोनवणे, शिवतेज कट्टे, ओमकार गुंजवटे, दत्ता बागल, रणजीत पडमलकर, प्रणित भोसले, सुमित जाधव, लखन पाटोळे, रोहित अवघडे, विराज अहिवळे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची एसटी महामंडळाकडून दखल घेऊन संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
छायाचित्र :
दहिवडी येथील आगार प्रमुखांना निवेदन देताना धैर्यशील पाटील व इतर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *