म्हसवड वार्ताहर …

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पुणे येथील सत्याग्रह आंदोलनाला माण-खटावमधील शेतकऱ्यानी जाहीर पाठिंबा दिला.

प्रगतशील शेतकरी अजित शिर्के यांनी माणदेशी आसूड घेऊन सरकारवर निशाणा साधत “विद्यार्थ्यांनी न्यायहक्कांसाठी लढत राहावे” असे आवाहन केले.
पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनाला माण-खटाव तालुक्यातील भाटकी गावातून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवत भाटकीतील शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा भाटकीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांमध्ये संधी मिळावी आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने पाठिंबा देण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रगतशील शेतकरी अजित शिर्के म्हणाले, “केंद्र आणि राज्य सरकारने विद्यार्थी व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. मात्र, सरकार या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरू ठेवावा. ग्रामीण भागातील शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अजित गोरख शिर्के, प्रल्हाद ज्ञानू शिर्के, तुकाराम दशरथ कोडलकर, चंद्रकांत महादेव शिर्के, पृथ्वीराज मनोज शिर्के, ओंकार बाळू शिर्के आणि चैतन्य महावीर शिर्के यांचा समावेश आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माण-खटावमधील शेतकऱ्यांनी दिलेला पाठिंबा हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत ग्रामीण भागातील संवेदनशीलता अधोरेखित करणारा आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भाटकीतील शेतकरी बांधवांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *