सोलापूर | दि. ४ ऑक्टोबर २०२६ सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे. सांगोला तालुक्यातील कटफळ येथे त्यांनी दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीची माहिती जाणून घेतली. सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, पीक नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक भागांत रब्बी हंगामाचीही चिंता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पाणी व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. दुष्काळाच्या सुरुवातीच्या काळात पालकमंत्री गोरे यांनी पंचनामे पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असे आवाहन केले होते. कटफळ येथील पाहणीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी आमदार शहाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, गट विकास अधिकारी अमोल जाधव, योगेश कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून पंचनामे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा व इतर आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या ९२ गावांमध्ये ८२ टँकर, ३३ विहिरी आणि १३ बोअरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पीक नुकसानभरपाई, पीकविमा, कर्जाबाबतचा दिलासा, चारा आणि पाणीपुरवठ्याबाबतच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे. पंचनाम्यांच्या आधारे शासनाकडून मदतीचे स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे. Post navigation राजकीय मंडळी विक्रम शिंगाडे यांना बदनाम करुन जातिय तेढ निर्माण करीत आहेत. -अर्जुन काळे 45 वर्षानंतर सांगोला महाविद्यालयालयातील मित्रांचे सांगोल्यात मित्र संमेलन संपन्न…