वैभव गणेश मंडळाची डीजेमुक्त, भक्तिमय विसर्जन मिरवणूक

सुशील त्रिगुणे…
म्हसवड : माण तालुक्यातील म्हसवड येथील वैभव गणेश मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त व शांत, भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली. म्हसवडचे आराध्य दैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाचा आकर्षक देखावा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरला.
वैभव गणेश मंडळाने साकारलेल्या आकर्षक रथाची विशेष सजावट करण्यात आली होती. रथावर विविध रंगांचे झेंडे लावण्यात आले होते. सुबकपणे सजविलेल्या रथामध्ये गणरायाची आकर्षक मूर्ती विराजमान करण्यात आली होती. या देखाव्याने मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक दत्त चौक, महात्मा फुले, चौक,म्हसवड बस स्टॅन्ड, सातारा पंढरपूर रोड , वेशीतून सिद्धनाथ मंदिर मार्गे काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणी गणेश भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले.
मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम व झांज पथकाने उत्साहात सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होत पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
गुलालाची उधळण आणि भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी रथाच्या दोरीला हात लावून रथ ओढण्याचा मान मिळविला. डीजेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे उत्सवाला वेगळेच धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
वैभव गणेश मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक, धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले. त्याची सांगता देखील शिस्तबद्ध आणि शांत वातावरणात केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हसवडकरांच्या वतीने कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *