माथाडी कामगार अनधिकृत टोळ्यांवर कठोर कारवाई साठी उच्चस्तरीय बैठक होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

(वाशी येथे गुणवंत माथाडी कामगारांचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवर (छाया- अजित जगताप, वाशी)

(अजित जगताप)
नवी मुंबई दि: महाराष्ट्रातील कष्टकरी माथाडी कामगारांच्या नावाचा गैरवापर करून कामगारांचे नुकसान करणाऱ्या अनधिकृत टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक होणार आहे तसेच ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या पोत्यांबाबतच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
माथाडींचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त वाशी येथील नवी मुंबई शेती उत्पन्न बाजार समिती आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
माथाडी कामगारांच्या वडाळा येथील गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून सुमारे २ हजार ८५० ते ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात येतील. भविष्यातही माथाडी कामगारांसाठी आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील सर्व ३६ माथाडी मंडळांचे सक्षमीकरण व पुनर्रचना करण्यात येणार असून, मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र पॅनेलमार्फत लेखापरीक्षण केले जाणार आहे. कामगारांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे तसेच अपघात नुकसानभरपाईचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील माथाडी मंडळे १९६९ पासून असंघटित हातमजूर कामगारांच्या कल्याण व सामाजिक सुरक्षेसाठी कार्यरत आहेत.

वाशी येथील नवी मुंबई शेती उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करून माथाडी कामगारांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येतील. त्याचबरोबर माथाडी कामगारांच्या मुलांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि ‘सारथी’च्या माध्यमातून उच्च शिक्षण व कौशल्य विकासाच्या स्वतंत्र योजना राबविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीवर भर देण्याचे आवाहन केले. पुढील पिढीने उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत प्रगती करावी, असे सांगताना माथाडी रुग्णालयाचे आधुनिकीकरण तसेच वडाळा गृहप्रकल्पाचे काम विनाविलंब पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पणन व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी बाजार व्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगितले. वाशी एपीएमसी मार्केटचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येणार असून, वजनाच्यानियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मंदाताई म्हात्रे, आ. निरंजन डावखरे, आ. मनोज जामसुतकर, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, डॉ. प्राची पाटील यांच्यासह माथाडी बोर्डाचे अधिकारी- कर्मचारी , माथाडी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे ‘माथाडी मित्र’ या पाक्षिकाचे ही पुनर्प्रकाशन केले.
. या वेळेला गुणवंत माथाडी कामगार गणपत पार्ट,किसन बोबडे,शोभा परुळेकर,लालबहादूर यादव,मारुती काळे,बाळू पानसरे,विठोबा जाधव,तुकाराम हसबे,धनाजी यादव,अर्जुन कोर,निलेश इप्पर,उत्तम आव्हाड,बाळू हिरगुडे,भगवान जरे,बाबासो चव्हाण,अमोल पाटील,अण्णाराव बोनवळे,तुकाराम पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार पुरस्कार व स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *