म्हसवड वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या ‘चला शाळेत जाऊया’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे सचिव श्री. दीपक माळी यांनी जिल्हा परिषद शाळा वाघमोडेवाडी, जिल्हा परिषद आदर्श शाळा विरकरवाडी तसेच शिक्षण परिषद महिमानगड येथे भेट देऊन शाळांमधील भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत डायट फलटणचे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. डोंबाळे साहेब, वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. भिसे साहेब तसेच माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. पिसे साहेब उपस्थित होते. भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी शाळांमधील विविध भौतिक सुविधांची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेताना भाषाज्ञान, संख्याज्ञान, वाचन, लेखन आदी मूलभूत कौशल्यांची वर्गनिहाय तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अध्ययन प्रक्रियेची माहितीही घेण्यात आली. शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमांचे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले. तसेच ज्या बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहे, त्या संदर्भात शिक्षकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. (वीरकर वाडी शाळेची पाहणी करताना अधिकारी वर्ग).. जिल्हा परिषद शाळा वाघमोडेवाडी येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहून सचिव श्री. दीपक माळी यांनी शाळेचे विशेष कौतुक केले. तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळा विरकरवाडी येथील भौतिक सुविधा, शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी याच पद्धतीने सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवावेत, अशा सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या. या भेटीमुळे शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रेरणा मिळाली. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळाले. Post navigation क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे कार्य गौरवशाली : डॉ. विश्वजीत कदम माथाडी कामगार अनधिकृत टोळ्यांवर कठोर कारवाई साठी उच्चस्तरीय बैठक होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस