आटपाडीत विलासजी खरात यांचा भव्य सत्कार; ‘डबई कुरण’ जमिनीच्या ऐतिहासिक विजयाचा मानदेशात जल्लोष!


​२४ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षाला अखेर यश; ६७ दलित कुटुंबांना प्रत्येकी ५ एकर जमिनीचा हक्क मिळवून दिल्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक


​आटपाडी (प्रतिनिधी):
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेल्या ऐतिहासिक पायावर अढळ निष्ठा ठेवून तब्बल २४ वर्षे अविरत लढा देणारे ‘भीम पॅंथर’ मा. विलासजी खरात यांनी ‘डबई कुरण’ जमीन प्रकरणी मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांच्या आटपाडी येथील निवासस्थानी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते भावूक व उत्साही वातावरणात नागरी सत्कार करण्यात आला.


​डबई कुरणातील १३४ हेक्टर जमिनीचा प्रश्न तडीस नेऊन ६७ वंचित व दलित कुटुंबांना प्रत्येकी ५ एकर जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य विलासजी खरात यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन सरकार व कलेक्टरांसमोर केलेला युक्तिवाद आणि दाखवलेल्या मार्गावर चालत विलासजींनी प्रशासकीय पाठपुरावा, कायदेशीर लढा आणि आंदोलनांच्या जोरावर या संघर्षावर विजयाचा कळस चढवला.
​या ऐतिहासिक यशाबद्दल दत्ता शेठ चव्हाण, रणजित ऐवळे, नवनाथ जावीर, बहादुर खरात, रोहित सुतार, सनी पवार, विवेक चंदनशिवे आणि शैलेश सुतार या मान्यवरांनी विलासजी खरात यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा यथोचित सत्कार केला व शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले.
​”दलित समाज आर्थिकदृष्ट्या कमजोर असेल, पण अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि आंबेडकरी विचार ही आमची सर्वात मोठी ताकद आहे,” हे या २४ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यातून विलासजींनी सिद्ध करून दाखवले आहे, अशा भावना याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. विलासजी हे केवळ डबई कुरण लढ्याचे नायकांपैकी एक नसून मानदेशातील १३ दुष्काळी तालुक्यांच्या पाणी चळवळीचेही आद्य प्रवर्तक राहिले आहेत, याचा गौरवपूर्ण उल्लेखही यावेळी करण्यात आला.
​या कौटुंबिक व सामाजिक सोहळ्याप्रसंगी श्रीमती पारुबाई धोंडीराम खरात, रेखा विष्णू मोटे, ललिता चंद्रकांत पवार, कविता दिलीप खरात, भारती विलास खरात, कुणाल दिलीप खरात यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मानदेशातून आज विलासजींच्या या कामगिरीचे आणि जिद्दीचे कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *