विजेच्या लपंडावामुळे पिंपोडे बुद्रुक परिसरात शेतकरी त्रस्त; बहरात आलेली पिके लागली कोमजू, महावितरणविरोधात संतापाची लाट

पिंपोडे बुद्रुक (प्रतिनिधी – अभिजीत लेंभे): कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक आणि परिसरात सध्या महावितरणच्या लहरी कारभारामुळे शेतकरी वर्ग कमालीचा संतापला आहे. पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे, परंतु विजेच्या सततच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले असून हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत कोमजू लागली आहेत.

या वर्षी सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या होत्या. सध्या पिके उत्तम बहरात आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. पिकांना तातडीने पाण्याची गरज असतानाच महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसत आहे. परिसरात विजेची अनिश्चितता, वारंवार होणारे ट्रिपिंग आणि अत्यंत कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे विहिरींमध्ये पाणी असूनही शेती पंप चालवणे कठीण झाले आहे. दिवसभर राबूनही एक एकर क्षेत्र भिजवणे शक्य होत नसून, विजेच्या खेळखंडोब्यामुळे महागड्या मोटारी व विद्युत उपकरणे जळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कर्ज काढून फुलवलेली पिके आता पाण्याच्या अभावामुळे जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत. महावितरणने या समस्येची तत्काळ गंभीर दखल घेऊन शेती पंपांसाठी दिवसा अखंडित आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

“पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या पिकांना पाण्याची प्रचंड गरज आहे. विहिरींना पाणी आहे, पण महावितरणच्या विजेच्या लपंडावामुळे शेती पंप चालवणे अशक्य झाले आहे. वीज कधी येते आणि कधी जाते याचा नेम उरलेला नाही. यामुळे बहरात आलेली पिके डोळ्यांदेखत कोमजत आहेत. महावितरणने नुकसान टाळण्यासाठी तात्काळ सुरळीत वीज पुरवठा करावा.”

नितीन नेवसे (शेतकरी, पिंपोडे बुद्रुक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *