टँकर मंजुरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे प्रांताधिकारी यांना देण्यात यावेत ; दिपकआबा साळुंखे पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

सांगोला तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. अशावेळी गावोगावी टँकर सुरू करण्यासाठी होणारी दिरंगाई टाळण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार पूर्वीप्रमाणेच प्रांत अधिकारी यांना देण्यात यावेत. अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे….

पावसाळा सुरू होऊन तब्बल तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही, सांगोला तालुक्याकडे वरुणराजाने पाठ फिरवल्याने सांगोला तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भाीषण समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे मात्र टँकर मंजुरीचे अधिकार सध्या जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात टँकर सुरू करण्यासाठी विलंब होऊ लागला आहे. सध्या सांगोला तालुक्यातील माण नदीला टेंभूचे पाणी सोडल्याने सुुमारे १५ ते २० गावांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. परंतु, तालुक्यातील एकूण गावांची संख्या पाहता आणखी ७० ते ८० गावांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. अशावेळी अनेक गावातून जनावरे आणि नागरिक यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत. मात्र, टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक प्रशासकीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी यांना नसल्याने टँकर सुरू करण्यास विलंब होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे.
सांगोला तालुक्यातील निम्म्याहून अधिक भाग अद्याप पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत असल्याने या भागातील नागरिकांना आणि पशुधनाला जीवनदान देण्यासाठी प्रशासनाला लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्या लागतील यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन यावर मार्ग काढावा अशी मागणी ही या निवेदनातून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी