सांगोला प्रतिनिधी : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने शिक्षकेतर पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवत यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकेतर संघटनेच्या महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रधान सचिवांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षकेतर पदभरतीचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला. शिक्षक भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने सुरू करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकेतर पदांची भरती तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या पाठपुराव्यानंतर ११ ऑगस्ट २०२६ रोजी शासनाने पदभरतीसंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून भरती प्रक्रियेला अधिकृत मंजुरी दिली. या निर्णयामुळे शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदे नियमानुसार भरण्याचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. “हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका संघटनेचा विजय नसून, महाराष्ट्रातील तमाम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया शिवाजीराव खांडेकर यांनी व्यक्त केली. शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले असून, आता भरती प्रक्रिया नियमानुसार आणि तातडीने सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Post navigation जि. प. प्राथमिक शाळा देवापूरची पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत भरारी; १२ हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण कळंबी केंद्र समूहाची शिक्षण परिषद उत्साहात.