सातारा: शासनाच्या अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (AAY) दारिद्र्यरेषेखालील अत्यंत गरीब, कष्टकरी आणि निराधार कुटुंबांसाठी मिळणाऱ्या अनुदानित साखरेचा साताऱ्यात सर्रास काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा शहरातील तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी अचानक टाकलेल्या धाडीत ‘स्वामी समर्थ स्टोअर्स’ या दुकानातून २०७ किलो अंत्योदय योजनेतील साखर जप्त केली आहे. या कारवाईमुळे साताऱ्यातील रेशनिंग माफियांचे धाबे दणाणले आहेत. गरीबांच्या तोंडातील गोडवा पळवणारा प्रकार देशातील भूक आणि कुपोषण मिटवण्यासाठी तसेच समाजातील अत्यंत गरीब घटकाला अन्न सुरक्षा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे २५-२६ वर्षांपूर्वी अंत्योदय योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असणारे, मजूर, रिक्षाचालक, कचरा वेचक, विधवा, विकलांग, ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर आजाराने बाधित कुटुंबांना प्रति महिना ३५ किलो धान्य व अवघ्या २० रुपये प्रति किलो दराने १ किलो साखर दिली जाते. सातारा शहर परिसरात सुमारे ५ ते ७ हजार अंत्योदय (पिवळे) शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. गरीब आणि गरजूंच्या हक्काची हीच साखर दुकानात अवैधरीत्या साठवून ठेवून स्वामी समर्थ स्टोअर्सच्या मालकाने स्वतःचा खिसा भरण्याचा प्रयत्न केल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुरवठा विभागाची धडक कारवाई सहाय्यक पुरवठा अधिकारी भरत तुंबडे, कनिष्ठ लिपिक उमेश उदागे आणि निलेश गायकवाड यांच्या पथकाने दोन पंचांच्या समक्ष ही कारवाई करून २०७ किलो साखरेचा साठा जप्त केला. “सदर साखरेचा पुरवठा या दुकानात कोणी केला? ही साखर कोणत्या ठेकेदाराच्या वाहनातून आली आणि यामागे कोणाची कृपा आहे, याचा सखोल तपास पोलीस आणि पुरवठा यंत्रणा करत आहे.” — माहितीगार/स्थानिक सूत्रे तक्रारदारांवर राजकीय दबाव; आंदोलनाचा इशारा हा संपूर्ण काळाबाजार उघडकीस आणणाऱ्या माहितीगारांनी अधिकृत तक्रार करू नये, यासाठी काही समाजकंटक व राजकीय पक्षांशी निगडित व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात दबाव आणला जात असल्याचे वृत्त आहे. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोबाईल कॉल्सची आणि संभाषणाची निष्पक्ष तपासणी करून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा बुरखा फाडावा, अशी आग्रही मागणी सातारा शहरातील गरीब कष्टकरी व मजुरांनी केली आहे. प्रशासनाने यावर कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. Post navigation सातारा जिल्ह्यात ‘ढ शाळा’ वेब सिरीजच्या शूटिंगने उडवली धमाल! जि. प. प्राथमिक शाळा देवापूरची पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत भरारी; १२ हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण