..
सातारा : सातारा जिल्ह्यात सध्या एका नव्या मराठी वेब सिरीजच्या शूटिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘ढ शाळा’ या आगळ्यावेगळ्या वेब सिरीजच्या शूटिंगने परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून, शूटिंगदरम्यानच या सिरीजला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

दिग्दर्शक आशिष पूजारी ‘ढ शाळा’च्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक भन्नाट आणि मनोरंजक वेब सिरीज घेऊन येत आहेत. साताऱ्यातील वेळे कामठी या गावात सध्या या वेब सिरीजचे शूटिंग सुरू आहे.

‘ढ शाळा’मध्ये प्रेक्षकांना केवळ कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार नाही, तर त्यामागे एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही असणार आहे. शाळा आणि शिक्षणाचे महत्त्व हा या वेब सिरीजचा एक महत्त्वाचा विषय आहे. जे आज शाळेत जात आहेत, तसेच ज्यांना त्यांच्या काळात शाळेत जाता आले नाही, अशा प्रत्येकासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आशिष पूजारी यांनी केला आहे.

कलाकारांची दमदार फळी आणि अनेक सरप्राईजेस!

‘ढ शाळा’चे आणखी एक खास आकर्षण म्हणजे या वेब सिरीजमधील दमदार कलाकारांची फळी! प्रेक्षकांना यामध्ये यापूर्वीही वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले कलाकार पाहायला मिळणार आहेत. मकरंद गोसावी, श्रावणी सोळास्कर, रमा लांजेकर आणि आदिनाथ जाधव यांसारखे कलाकार या सिरीजचा भाग आहेत.

मात्र एवढ्यावरच ही कलाकारांची यादी थांबत नाही. या कलाकारांसोबतच प्रेक्षकांना अजून अनेक सरप्राईजेस मिळणार आहेत. सिरीजमध्ये आणखी काही सरप्राईज कलाकारांची एंट्री पाहायला मिळणार असून, त्यांच्या भूमिका आणि व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहेत.

यावेळी आणखी एक खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच वेब सिरीजच्या माध्यमातून पृथ्वीराज लाड आणि गणेश बिसे या कलाकारांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या अभिनयाचा आणि कॉमेडीचा भन्नाट तडका ‘ढ शाळा’मध्ये पाहायला मिळणार असून, त्यांची ही जोडी प्रेक्षकांना नक्कीच खळखळून हसवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, ‘ढ शाळा’ ही एक फॅमिली कॉमेडी वेब सिरीज असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सामाजिक संदेश, शाळेच्या आठवणी, भन्नाट व्यक्तिरेखा, सरप्राईज कलाकार आणि भरपूर कॉमेडी यांचा अनोखा मेळ या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.

शूटिंगच्या ठिकाणी कलाकार आणि टीमची लगबग पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, ‘ढ शाळा’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे.

आता ही आगळीवेगळी ‘ढ शाळा’ प्रेक्षकांना किती हसवते, शिक्षणाचा संदेश किती प्रभावीपणे पोहोचवते आणि या सिरीजमध्ये आणखी कोणते सरप्राईज कलाकार पाहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *