पुणे (प्रतिनिधी): चिंचवडगाव येथील प्रसिद्ध एल. प्रो. इंटरनॅशनल स्कूल आणि तेज ट्रॅव्हल्सच्या स्कूलबस मालकांकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) कडक नियम उघडपणे धाब्यावर बसवले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बेकायदेशीर आणि धोकादायक विद्यार्थी वाहतुकीविरोधात शिवस्वराज्य युवा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, वाहतूक पोलीस उपआयुक्तांनी संबंधित शाळा प्रशासन आणि बस मालकावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. शाळेची मनमानी अन् नागरिकांना नाहक त्रास शाळेकडे स्वतःची अधिकृत पार्किंग व्यवस्था उपलब्ध असतानाही त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे पालकांची वाहने आणि स्कूलबसेस थेट रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. परिणामी, चिंचवड परिसरातील रस्त्यांवर दररोज मोठी वाहतूक कोंडी होऊन स्थानिक रहिवाशांना आणि वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! संघटनेचे गंभीर आरोप: ओव्हरलोड वाहतूक: एकाच स्कूलबसमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त, म्हणजे तब्बल ५० ते ६० विद्यार्थ्यांना कोंबून नेले जात आहे. नशेत ड्रायव्हिंग: एल. प्रो. शाळेच्या बसेस चालवणारे काही चालक दारू पिऊन गाड्या चालवत असल्याचा अतिशय धक्कादायक आरोप संघटनेने केला आहे. सुरक्षेचा फज्जा: वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, टॅक्स भरलाय का, चालकाचा परवाना (लायसन्स) व बॅच, तसेच बसमध्ये आपत्कालीन अग्निशामक सिलेंडर आहेत की नाहीत, याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. RTO कडून एकाच व्यक्तीच्या नावावर किती परवाने दिले गेले, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाला ५ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे हवीत: १. स्कूलबसमध्ये वाहन स्पीड गव्हर्नर (स्पीड कंट्रोल यंत्र) बसवले आहे का? २. आपत्कालीन परिस्थितीसाठी धोक्याचा इशारा देणारा अलार्म बसमध्ये कार्यरत आहे का? ३. नियमानुसार शाळेची ओळख दर्शवणारा स्पष्ट बोर्ड बसवर लावला आहे का? ४. बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिकृत महिला व पुरुष सेवकांची नियुक्ती झाली आहे का? ५. बस ड्रायव्हर, सुपरवायझर आणि महिला सेविकांचे पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification) शाळेने जमा करून घेतले आहे का? कारवाई न झाल्यास अमरण उपोषणाचा इशारा! “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या एल. प्रो. शाळा प्रशासन आणि तेज ट्रॅव्हल्सवर वाहतूक पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा. जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर मी स्वतः शाळेच्या मुख्य गेटसमोर ‘आमरण उपोषणाला’ बसणार आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे पोलीस प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि तेज ट्रॅव्हल्स जबाबदार असतील.” — संदीपराजे मुटकुळे-पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिवस्वराज्य युवा संघटना) Post navigation सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती श्रीराम वास्ते यांचे शिष्य वृती परिक्षेत यश..