म्हसवड परिसरात भीषण अपघात : उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

म्हसवड परिसरात भीषण अपघात : उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

म्हसवड, दि. 11 जानेवारी 2026 – माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून एक तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 14/2026 प्रमाणे मोटार वाहन अधिनियम तसेच BNS मधील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची घटना –
दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी रात्री साधारण 8.30 वाजण्याच्या सुमारास कुकुडवाड–मायणी रोडवर कुकुडवाडपासून पुढे अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. सुरज संजय माने (वय 30, रा. म्हसवड) हा आपल्या TVS Iqube (क्र. MH 11 DS 1806) इलेक्ट्रिक दुचाकीवरून खटाव माण अॅग्रो शुगर फॅक्टरी, पडळ येथे ड्युटीस जात होता.

त्याच्या पुढे भारत विठ्ठल शिंदे (रा. ढाकणी, ता. माण) हा Massey Ferguson कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH 11 BZ 1360) तसेच दोन उसाने भरलेल्या ट्रॉलींसह जात होता. चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणे वाहन चालवल्याने ट्रॉली जोडणारी पिन तुटली. त्यामुळे मागील दोन्ही उसाने भरलेल्या ट्रॉली अचानक रस्त्यावर सरकून मागून येणाऱ्या सुरज माने यांच्या दुचाकीवर आदळल्या.

या जोरदार धडकेत सुरज माने हे ट्रॉलीखाली गंभीररित्या दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतरही चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीने सांगितले.

फिर्याद व गुन्हा नोंद
मृतकाचा भाऊ धीरज संजय माने (वय 33, रा. म्हसवड) यांनी 11 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1.37 वाजता म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

चालक भारत विठ्ठल शिंदे याच्याविरुद्ध खालीलप्रमाणे कलमान्वये गुन्हा दाखल :

BNS कलमे : 106, 281, 125(A), 125(B), 324(4)

मोटार वाहन अधिनियम : 184, 134(A)(B)

तपास अधिकारी :
पो.हवा. खाडे (ब.क्र. 376), म्हसवड पोलीस ठाणे – मो. 8999285455
तपास करीत आहेत.

ही घटना संपूर्ण माण तालुक्यात हळहळ व्यक्त करणारी ठरली असून उसाच्या हंगामात वाढणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीतील सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *