म्हसवड वृत्तसेवा….

माणदेशीच्या कुकुडवाड येथील स्वरांजली व गीतांजली बहिणींचा कीर्तन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने माण तालुक्यात कौतुक होत आहे.
माण तालुक्यातील कुकुडवाड येथील स्वरांजली व गीतांजली गोंजारी या दोन सख्या बहिणींनी अल्पवयातच कीर्तन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. स्वरांजली इयत्ता दहावी तर गीतांजली इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून दोघीही बार्शी येथील नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी शिक्षण घेत आहेत.

लहानपणापासूनच पारायण, प्रवचन आणि हरिकीर्तन ऐकण्याची आवड असल्याने त्यांची अध्यात्माकडे ओढ निर्माण झाली. या आवडीला आई रेखा गोंजारी व वडील धनंजय गोंजारी यांनी प्रोत्साहन दिले. त्यातूनच दोन्ही बहिणींनी कीर्तनकलेत प्राविण्य मिळवले.

आज त्या विविध गावांमध्ये कीर्तन सेवा देत असून त्यांच्या ओघवत्या वाणीने, संतवाङ्मयावरील अभ्यासपूर्ण निरूपणाने आणि प्रभावी सादरीकरणाने श्रोत्यांची मने जिंकली आहेत. त्यांच्या कीर्तनाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून माणदेशातील या गुणी कन्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वारकरी परंपरेचे संस्कार जपत अध्यात्म आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेणाऱ्या स्वरांजली व गीतांजली गोंजारी या बहिणी आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *