“महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आजी-नातवाचा मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अन्यथा ६ जुलै रोजी महावितरण कार्यालयासमोर दिवंगत आजी-नातवाचा प्रतीकात्मक ‘तेरावा’!”– म्हसवड, वृत्तसेवा दि. २९ जून :मार्डी (ता. माण) येथे विजेचा धक्का लागून सुमन विलास काळे (वय ६०) आणि त्यांचा १३ वर्षीय नातू सुजित युवराज काळे यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. या घटनेपूर्वी संबंधित वीजवाहिनी जवळपास महिनाभर तुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडून होती आणि याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याचा दावा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह लागू असलेल्या कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केली आहे. यासंदर्भात मा. अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा मंडळ यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांनी धोकादायक वीजवाहिनीबाबत वेळोवेळी सूचना दिल्या असतानाही आवश्यक दुरुस्ती वेळेत करण्यात आली नाही. जर या दाव्यांची चौकशीत पुष्टी झाली, तर ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची ठरू शकते. त्यामुळे संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. महेश करचे यांनी सांगितले की, "भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ ने प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार दिला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव जात असेल, तर ती केवळ प्रशासकीय चूक नसून सार्वजनिक उत्तरदायित्वाचा गंभीर प्रश्न आहे. दोन निष्पाप जीव गमावल्यानंतरही दोषींवर कारवाई झाली नाही, तर नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल." निवेदनाद्वारे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत : या प्रकरणाची स्वतंत्र व वेळबद्ध उच्चस्तरीय चौकशी. दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधासह लागू असलेल्या कायद्यानुसार फौजदारी कारवाई. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करणे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹१० लाख आर्थिक मदत. कुटुंबातील पात्र व्यक्तीस महावितरणमध्ये सहानुभूती तत्त्वावर नोकरी. संपूर्ण माण-खटाव तालुक्यातील वीजवाहिन्यांचे विशेष सुरक्षा ऑडिट करून धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती. महेश करचे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, निवेदनातील मागण्यांवर तातडीने ठोस कार्यवाही झाली नाही, तर सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी पीडित कुटुंबियांसह सातारा येथील महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर दिवंगत सुमन काळे व सुजित काळे या आजी-नातवाचा प्रतीकात्मक "तेरावा" घालून शांततापूर्ण परंतु तीव्र संविधानिक आंदोलन करण्यात येईल. "दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतरही व्यवस्था जागी होत नसेल, तर जनतेच्या वेदना लोकशाही मार्गाने प्रशासनापर्यंत पोहोचविणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. न्याय मिळेपर्यंत संविधानिक लढा सुरू राहील," असेही महेश करचे यांनी शेवटी नमूद केले. … Post navigation माणदेशी भगिनींना किर्तनात डंका… क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गुरुकुल प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या कु. लाव्या नागनाथ वाघमारे हिचा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार ने गौरव