वाळू माफियांना दणका • 7 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
म्हसवड वार्ताहर (ता. माण) – म्हसवड पोलीस ठाण्याच्या पथकाने शिरताव गाव हद्दीत अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई करत एक चारचाकी पिकअप व वाळूसह एकूण 7 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पळशी येथील श्रीशैल्य मोहन खाडे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेचा तपशील
शिरताव गावातील स्मशानभूमीमागील ओढ्यात काही इसम अवैध वाळू उत्खनन करत असल्याची खात्रीलायक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ स्टाफसह छापा टाकला असता, पांढऱ्या रंगाचा वाळूने भरलेला पिकअप आढळून आला. पोलिसांना पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
या प्रकरणी राहुल राजेंद्र थोरात यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुरनं. 375/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी अज्ञात असल्यामुळे तपास पथक त्यांचा शोध घेत होते.
तांत्रिक तपास, मोबाईल विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित हा पळशी येथील श्रीशैल्य मोहन खाडे असल्याचे निष्पन्न झाले. काल रात्री पळशी परिसरातून त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
सोनवणे यांची सातत्यपूर्ण मोहीम
म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून एपीआय अक्षय सोनवणे यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. यापुढेही अशाच पद्धतीने कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्षय सोनवणे (सहाय्यक पोलीस निरीक्षक),
पीएसआय अनिल वाघमोडे,
शहाजी वाघमारे,मैना हांगे,
देवानंद खाडे,राहुल थोरात,
नवनाथ शिरकुळे,अभिजीत भादुले,
धीरज कवडे. यांनी या कारवाईत भाग घेतला..
