साहित्य क्षेत्रातील ‘माणदेशचा’ सुवर्णक्षण! ज्येष्ठ साहित्यिक विलास खरात यांच्या ‘गावगाडा’ पुस्तकाचा कानडीत अनुवाद; वर्धा येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाध्यक्षपदी निवड आटपाडी / प्रतिनिधी :माणदेशच्या मातीतील शब्दवैभव आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता सरहद्दी ओलांडून दाही दिशांना पोहोचत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आटपाडीचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक मा. विलासजी खरात यांच्या राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारप्राप्त ‘गावगाडा’ या अत्यंत लोकप्रिय पुस्तकाचा आता कानडी (कन्नड) भाषेत अनुवाद होणार असून, हा माणदेशच्या साहित्यिक चळवळीचा बहुमान मानला जात आहे.या दुग्धशर्करा योगासोबतच, नागपूरच्या ‘बालाजी सरोज भाव काव्य मराठी साहित्य प्रतिष्ठान’तर्फे नोव्हेंबर महिन्यात बापू कुटी, सेवाग्राम (जि. वर्धा) येथे आयोजित होणाऱ्या ऐतिहासिक ६ व्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाध्यक्षपदी विलास खरात यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या दुहेरी सुवर्णमुकुटामुळे संपूर्ण आटपाडी तालुक्यासह महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.”शब्दांना लाभले पंख हे विश्वाचे,माणच्या मातीतून उडाले भरारी घेण्या गगनाचे!गावगाड्याचा हा सुगंध आता दाही दिशांना सुटला,आटपाडीच्या वैभवाचा नवा इतिहास घडला!”’गावगाडा’ आता कानडी भाषेत; भाषिक सीमा ओलांडणारा प्रवासग्रामीण संस्कृती, समाजजीवन आणि गावचा गाडा हाकणाऱ्या घटकांचे अत्यंत जिवंत चित्रण विलास खरात यांनी आपल्या ‘गावगाडा’ या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाला यापूर्वीच राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता हे पुस्तक कानडी भाषेत रूपांतरित होणार असल्याने, कर्नाटक राज्यातील वाचकांनाही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा हा अनमोल ठेवा अनुभवता येणार आहे. एका मराठी लेखकाच्या कलाकृतीला शेजारच्या राज्यात मिळणारा हा सन्मान आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे.सेवाग्रामच्या ऐतिहासिक भूमीत भूषवणार कवी संमेलनाध्यक्षपदमहात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्धा येथील ‘बापू कुटी’ सेवाग्राम या ऐतिहासिक ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात दोन दिवसीय सहावे मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनातील अत्यंत महत्त्वाच्या आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘कवी संमेलनाचे’ अध्यक्षपद विलास खरात भूषवणार आहेत. प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सरोज अंदनकर (नागपूर) यांनी याबाबतचे जाहीर निमंत्रण व पत्र प्रसिद्ध करून खरात यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली असून, लवकरच त्यांना औपचारिक निवडपत्र पाठवले जाणार आहे.आटपाडीतून अभिनंदनाचा कडकडाट!विलास खरात यांच्या या दुहेरी यशामुळे आटपाडीच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. आटपाडीतील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, तरुण कवींनी आणि नागरिकांनी त्यांची भेट घेऊन व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.माणदेशी मातीचा अस्सल सुगंध आपल्या लेखणीतून जागतिक स्तरावर नेणाऱ्या आणि संमेलनाध्यक्ष पदाच्या माध्यमातून आटपाडीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावणाऱ्या विलास खरात यांना भावी वाटचालीस ‘माणदेश न्यूज’ आणि तमाम साहित्य रसिकांकडून हार्दिक शुभेच्छा! Post navigation जनगणना करतेवेळी लिंगायतांनी काय लिहावं -दानिश तिमशेट्टी अत्यंत दुर्दैवी घटना, स्कार्पिओ कार दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू.