हिंगणीतील शेतकऱ्यांचा आदर्श निर्णय; 20 वर्षांचा पानंद रस्त्याचा वाद मिटवून स्वखर्चाने उभारला रस्ता

धुळदेव वृत्तसेवा…

माण तालुक्यातील हिंगणी येथे गेल्या तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेला पानंद रस्त्याचा वाद अखेर शेतकऱ्यांच्या एकोप्याने मिटला असून, स्वखर्चातून सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे तब्बल 300 ते 350 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिंगणी गावातील शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी कोणताही हक्काचा पानंद रस्ता नव्हता. त्यामुळे शेतमाल घरी आणण्यासाठी बैलगाडी किंवा ट्रॅक्टरला इतरांच्या शेतातून जावे लागत होते. यावरून अनेकदा वाद निर्माण होत होते. काही प्रकरणे कोर्टात गेली होती, मात्र निकालासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत होती.

अशा परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते डॉ. आप्पासाहेब घुटुकडे यांनी पुढाकार घेत सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणले. परस्पर समन्वय साधत सर्वानुमते रस्त्याचा वाद मिटवण्यात आला. विशेष म्हणजे, या रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 5 फूट जागा शेतकऱ्यांनी स्वतःहून सोडली असून, सुमारे 10 फूट रुंदीचा आणि तीन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा रस्ता स्वखर्चातून तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, या रस्त्याची पाहणी करण्यासाठी म्हसवडच्या अप्पर तहसीलदार सौ. बाबर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या एकोप्याचे कौतुक करत म्हटले की,
“आजकाल शेती व रस्त्याचे वाद लवकर मिटत नाहीत. कोर्टातून निकाल लागायला अनेक वर्षे लागतात, काही वेळा पिढ्यानपिढ्या वाद सुरूच राहतात. मात्र हिंगणीतील शेतकऱ्यांनी दाखवलेला आदर्श महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”

डॉ. घुटुकडे यांनी सांगितले की,
“गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या वादामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे सर्वांना एकत्र करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्णय घेतला आणि आज तो यशस्वी झाला.”
हिंगणी ग्रामपंचायत तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे अशक्य वाटणारे काम शक्य झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!