पुसेसावळी पोलीसांची प्रामाणिकपणाला दाद; हरवलेले 19,670 रुपये मालकाला परत सातारा (प्रतिनिधी – आधिकराव सावंत):खटाव तालुक्यातील औंध पोलीस स्टेशन अंतर्गत पुसेसावळी येथे प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. पुसेसावळी पोलीसांनी तत्परतेने कारवाई करत हरवलेले 19 हजार 670 रुपये व महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या मूळ मालकाला परत करून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. आज सकाळी पुसेसावळी येथील पेठ परिसरात खरशिंगे गावचे दीपक कदम यांना एक पाकीट सापडले. त्यांनी विलंब न करता ते पाकीट पुसेसावळी पोलीस ठाण्यात जमा केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांनी पाकिटाची तपासणी केली असता त्यामध्ये 19,670 रुपये रोख रक्कम, पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. कागदपत्रांच्या आधारे हे पाकीट कळंबी गावातील साजिद मुलानी यांचे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कळंबी गावचे पोलीस पाटील हणुमंत सगरे यांच्याशी संपर्क साधून साजिद मुलानी यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यानंतर सर्व पडताळणी करून त्यांना त्यांचे पाकीट व संपूर्ण रक्कम सुरक्षितरित्या सुपूर्त करण्यात आली. या वेळी उपनिरीक्षक अनिल शिरोळे, पोलीस कर्मचारी राऊत, हणुमंत सगरे, सतीश काळे, सलीम मुलानी, गोरख घाडगे आदी उपस्थित होते. पुसेसावळी पोलीसांच्या वतीने प्रामाणिकपणा दाखवणारे दीपक कदम यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात पोलीसांविषयीचा विश्वास अधिक बळकट झाला असून, प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. Post navigation अकलूज येथे संघशताब्दी संवाद कार्यक्रम संपन्न जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कटिबद्ध: पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे