वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २१ : आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांची माहिती दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.

पुलकुंडवार म्हणाले की, पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर ३७०० मोबाईल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा ५ हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन, सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री महोदय यांचे सचिव राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!