म्हसवड (प्रतिनिधी) – थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन इंजिनिअर सुनील पोरे यांनी केले. म्हसवड येथील मोफत नगर वाचनालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या इंजि. सुनील पोरे यांनी मार्गदर्शन करताना महात्मा फुले यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचत 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या कार्यात सावित्रीबाई फुले यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले तसेच अनाथ आणि गरजू मुलांसाठी आश्रयस्थाने उभारली. शेतकरी, दलित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. याशिवाय, ‘सत्यशोधक समाज’ या संस्थेची स्थापना करून समाजातील अन्यायकारक प्रथा मोडीत काढण्याचे कार्य त्यांनी केले. समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे ठरले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इंजि. सुनील पोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी मोफत नगर वाचनालयाचे अध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी, विकास गोंजारी, जयंत राऊत, लखन मंडले यांच्यासह वाचनालयातील वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, त्यांच्या विचारांचे अनुसरण करून शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले. Post navigation शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दरे मुक्कामी घेतली उपमुख्यमंत्री यांची भेट जोतिष अभ्यासक भरत होसिंग यांना विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.