वयाची अट नाही, शिक्षणाची जिद्द मोठी! माणच्या कासारवाडीतील ११ महिलांनी दिली १० वीची परीक्षा बिदाल प्रतिनिधी (आकाश दडस ): माण तालुक्यातील कासारवाडी येथील महिलांनी ‘शिकायला वय नसते’ हे आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. याशनी राजन यांच्या प्रेरणेतून, गावातील ३५ ते ६० वयोगटातील ११ महिलांनी यंदा दहावीची परीक्षा दिली. आज त्यांचा शेवटचा पेपर यशस्वीरित्या पार पडला असून, या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.सीईओंच्या आवाहनाला महिलांचा प्रतिसाद मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशनी राजन यांनी काही महिन्यांपूर्वी कासारवाडी गावाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी गावातील महिलांशी संवाद साधला. ज्या महिलांचे शिक्षण १० वीच्या खाली राहिले आहे, त्यांनी पुन्हा शैक्षणिक प्रवाहात यावे आणि यंदा १० वीची परीक्षा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या शब्दांनी महिलांना प्रोत्साहन मिळाले आणि गावातील ११ महिलांनी परीक्षेचा अर्ज भरण्याचा धाडसी निर्णय घेतला. जेव्हा हातात पेन आणि पेपर घेऊन परीक्षा केंद्रावर जात होत्या, तेव्हा संपूर्ण गावाने त्यांना प्रोत्साहन दिले. आज शेवटचा पेपर संपल्यानंतर या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती माण आणि सातारा जिल्हा परिषद प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले असून, कासारवाडीचा हा ‘शैक्षणिक पॅटर्न’ इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. बातमी चौकट “गावातील महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हे आमचे ध्येय आहे. या महिलांनी दाखवून दिले की मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पंचायत समिती माण आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले. — सौ. छाया सस्ते, सरपंच, कासारवाडी ता माण फोटो ओळी मलवडी येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर कासारवाडीया महिला (छायाचित्र आकाश दडस) Post navigation सुयोग्य शैक्षणिक नियोजन यशाचा पाया-कृषिरत्न विश्वंभर बाबर फटाके- गुलाल आणि ढोल ताशा तयार पण जि. प. नूतन अध्यक्षाचा पत्ता नाही