कोयता-तलवारींसह चार जण अटकेत; ‘गरुड गॅंग’चा बिमोड
म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारे व्हिडिओ अपलोड करणाऱ्या चार तरुणांना कोयता, तलवारी यांसारख्या घातक हत्यारांसह ताब्यात घेतले. आगामी 2025 नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे उडाली धावपळ
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की म्हसवड व पळसावडे परिसरातील काही युवकांनी ‘नायक नाही, खलनायक हु मैं’ अशा प्रकारच्या गाण्यांसह हत्यारे दाखवत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या व्हिडिओंमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची तक्रार होती.
त्यावर तात्काळ हालचाल करत गुन्हे प्रकटीकरण शाखेसोबत एपीआय सोनवणे यांनी सापळा रचला. आरोपी मोटरसायकलवर फिरत असताना त्यांचा पाठलाग करून सर्वांना ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यांच्या जवळ कोयते, तलवारी यांसारखी धोकादायक हत्यारे आढळली.
‘गरुड गॅंग’चे उघड झाले अस्तित्व
चौकशीदरम्यान हे सर्व आरोपी ‘गरुड गॅंग’ नावाचे टोळके स्थापन करून अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले.
सोशल मीडियावर अशा प्रकारची प्रक्षोभक, दहशत पसरविणारी रील्स बनविणे हा गंभीर गुन्हा असून, पोलिसांनी या घटनास्थळी पंचनामा करून आरोपींकडील लपवलेली इतर हत्यारेही जप्त केली आहेत.
या कारवाईमुळे ‘गरुड गॅंग’चा पूर्णतः बिमोड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटकेत असलेले आरोपी
- उत्कर्ष भागवत जानकर
- सिद्धार्थ किरण रावळ
- शंतनु विकास शीलवंत
- आर्यन राहुल सरतापे
या चौघांवर भारतीय शस्त्र अधिनियमासह संबंधित गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रभावी भूमिका
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कार्यवाहीत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
अक्षय सोनवणे (सहाय्यक पोलिस निरीक्षक), अनिल वाघमोडे (पोलिस उपनिरीक्षक), मैना हांगे, रूपाली फडतरे, अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, अभिजीत भादुले, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, संतोष काळे, धीरज कवडे, सतीश जाधव, हर्षदा गडदे. यांनी या कारवाईत भाग घेतला..
