(मुरुम प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , श्री छत्रपती संभाजीनगर व आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरास आज बुधवार दि. ११ फेब्रुवारी पासून तालुक्यातील कुन्हाळी येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
” पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व पडीक जमिनीच्या शाश्वत विकासात युवक- युवतींची भूमिका ” या संकल्पनेवर आधारित सात दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मल्लीनाथ दंडगे यांच्या हस्ते करण्यात आले . अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर होते. सरपंच कमलादेवी लव्हरे, उपसरपंच सुधीर पाटील , प्राचार्य डॉ. राम सोलंकर, मुख्याध्यापक बलभीम चव्हाण, पोलीस पाटील संजय पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. सेंद्रीय शेती , विकसित भारत , पर्यावरण संवर्धन , ग्रामस्वच्छता, शाळा परिसर स्वच्छता , आपला देश आपले संविधान , या विविध विषयावर तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना रामकृष्णपंत खरोसेकर म्हणाले कि – विद्यार्थी हा समाज व्यवस्थेचा पाया आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उत्कृष्ट समाज निर्मिती करणारे विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य केले जाते. तरुण वयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिबिरा मुळे समाजसेवा करण्याची व शिकण्याची संधी मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुसंस्कारीत विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा खरोसेकर यांनी या वेळी केली.
या वेळी प्राचार्य डॉ. राम सोलंकर यांचे मार्गदर्शन झाले . प्राचार्य डॉ. सोलंकर म्हणाले कि – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञाना बरोबरच समाज सेवेचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. समाजसेवे मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारत देशाचे निर्माते आहेत.विद्यार्थ्यांनी प्रगतशील देशाच्या निर्मितीत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा . राष्ट्रीय सेवा योजना हे सामाजिक अध्यात्म आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विकसित राष्ट्र निर्मिती करिता आपले योगदान द्यावे असे अवाहन प्राचार्य डॉ. सोलंकर यांनी या वेळी केले.

प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी केले. आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. तात्याराव चव्हाण यांनी मानले. प्राध्यापक, शिबिरार्थी विद्यार्थी , कुन्हाळी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
