शेतकऱ्यांना लूटणारी टोळी जेरबंद; म्हसवड पोलिसांची 12 तासांत धडाकेबाज कारवाई
✅ 22.50 लाखांचा मुद्देमाल जप्त
✅ तीन सराईत आरोपींना अटक
✅ व्यापाऱ्यांना मारहाण करून लुटण्याचा प्रकार उघड
✅ सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा जलद छडा
✅ आरोपींना न्यायालयाकडून 6 दिवसांची पोलीस कोठडी
👉 शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन साहित्य आणणाऱ्या व्यापाऱ्यांना बनावट ऑर्डर देऊन म्हसवड येथे बोलावण्यात आले. भाटकी परिसरात मारहाण करून तब्बल 22.50 लाखांचा माल लुटण्यात आला होता.
👉 सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत सोलापूर जिल्ह्यातून तीन आरोपींना ताब्यात घेत मुद्देमालासह गुन्हा उघडकीस आणला.
🔥 म्हसवड पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

…
म्हसवड : शेतीमालाच्या व्यापाऱ्यांना मारहाण करून लुटणाऱ्या सराईत टोळीचा म्हसवड पोलिसांनी अवघ्या बारा तासांत पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत तब्बल 22 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कामगिरीचे व्यापाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
पुणे येथील आर. के. ड्रीप अँड मल्चिंग प्रोडक्शन कंपनीकडून ठिबक सिंचनच्या पाईपची बनावट ऑर्डर देत अज्ञात व्यक्तींनी व्यापाऱ्यांना म्हसवड येथे बोलावले होते. तक्रारदार शशिकांत नानाभाऊ वाघ (रा. रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे नारायणगावहून अशोक लेलँड गाडीतून माल घेऊन आले असता, भाटकी गावाजवळील माळरानावर आरोपींनी त्यांना थांबवले.
बुलेटवर आलेल्या दोन आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्याला गाडीतून खेचून मारहाण केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि गाडीतला सर्व माल उतरवून घेतला. त्यानंतर पिकअप वाहन बोलावून मुद्देमाल घेऊन आरोपी फरार झाले. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने तपास पथक रवाना केले. तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वेगवान हालचाली करत जनार्दन विलास लोखंडे (रा. अकलूज), किरण अभिमान उर्फ अभिमन्यू पवार (रा. अकलूज) आणि विजय गोरख शिंदे (रा. निमगाव टेंभुर्णी, ता. माढा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींवर विविध जिल्ह्यांत गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यालाही याच पद्धतीने लुटल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे. न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे तसेच अमर नारनवर, देवानंद खाडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलाणी आणि धीरज कवडे यांनी सहभाग घेतला.
अवघ्या बारा तासांत गुन्हा उघडकीस आणत व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करणारी ही कारवाई म्हसवड पोलिसांच्या दक्षतेचे द्योतक ठरली आहे.
