सातारा प्रतिनिधी ..
सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार अजित काशीनाथ जगताप (वय ६१) यांना धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अजीत जगताप यांनी सातारा प्रतिनिधी म्हणून विविध वृत्तपत्रांमधून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
मुंबई येथील दैनिक नवशक्ती, दैनिक नवकाळ, तसेच साप्ताहिक लोकप्रभा आणि साप्ताहिक सकाळमध्ये त्यांनी सामाजिक, राष्ट्रीय व विविध समकालीन विषयांवर प्रभावी लेखन केले. सातारा जिल्ह्यात दैनिक पंजीकरण, पुढारी, युवा भारत, तसेच विशेषतः जिल्ह्याचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या दैनिक ऐक्य आणि ग्रामोद्धारमध्ये काम करताना त्यांनी परखड, निर्भीड व जनहिताची पत्रकारिता केली.
तीर्थक्षेत्र श्री मेरुलिंग (ता. जावळी) येथील दलित समाजावर असलेल्या अन्यायकारक पाणिप्रथेचा प्रश्न असो वा धरणग्रस्तांच्या समस्या—या व अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवून अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांच्या पत्रकारितेमुळे सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणे, तसेच सामान्य नागरिकांच्या सहकार्याने प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही धगधगती मुंबई आणि DDM News या माध्यमांतून त्यांची बातमीदारी सुरू आहे. यापूर्वी राज्य शासनानेही त्यांना वरिष्ठ पत्रकार म्हणून सन्मानित केले आहे.
सदर जीवन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ नवी मुंबई येथील स्व. अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४/५, कोपरखैरणे येथे होणार असून, मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या घोषणेमुळे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून अजित जगताप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
